खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळी

मका पिकात अमेरिकन लष्करी अळी दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी प्रादुर्भाव व नुकसानीची टक्केवारी लक्षात घेता पोंग्यात चुना व वाळू टाकावी. तसेच या अळीच्या अनुषंगाने कामगंध सापळ्यांचा वापर करावा. कीटकनाशकांचा वापर कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार करणे योग्य राहील. - डॉ. हेमंत बाहेती, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद, जि. जळगाव
मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे
मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे

जळगाव  ः खानदेशात मक्‍याची सुमारे ५५ हजार हेक्‍टरवर लागवड झाली आहे. परंतु खरिपाप्रमाणे आता रब्बीमध्येही मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत आहेत. उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. शासनाकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

यंदा समाधानकारक पाऊस झाला. पाऊस लांबल्याने रब्बीची पेरणी उशिरा झाली. तसेच अवकाळी पावसाने खरिपाचे नुकसान झाले. सततच्या ढगाळ वातावरणाने मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव अधिक वाढत आहे. अंड्यातून बाहेर आलेली प्राथमिक अवस्थेतील अळी कोवळ्या पानांचा हिरवा भाग खात आहे. त्यामुळे मुख्य पानांवर पांढरे चट्टे दिसून येत आहेत. या अळ्या दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेत पानांवर छिद्रे पाडून पानाच्या कडेपासून शिऱ्याकडे पाने खायला सुरुवात करीत आहेत. 

काही भागात या अळ्या झाडाची पाने खाऊन पानाच्या फक्त शिरा शिल्लक ठेवत आहेत. यात अनेक भागात ३० ते ३५ टक्के नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, एरंडोल, चोपडा, यावल, रावेर, पाचोरा, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे, नंदुरबारमधील शहादा, तळोदा या भागात या अळीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या भागात मक्‍याचे उत्पादन लष्करी अळीमुळे कमी होईल, हे निश्‍चित आहे. अनेक भागात मका पीक दोन ते अडीच महिन्याचे आहे. काही शेतकऱ्यांनी कीटकनाशकांवर मोठा खर्च करून पीक वाचविले आहे. परंतु अल्पभूधारक, आर्थिक स्थिती कमकुवत असलेले शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, त्यांच्यावर पीक मोडण्याची वेळ आली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com