‘पोकरा’ प्रकल्पात कृषी यांत्रिकीकरणाचे अर्ज `होल्ड`वर

कृषी यांत्रिकीकरणाबाबत अभ्यास करून मार्गदर्शक सूचना बनविण्यात आल्या आहेत. या योजनेतून यांत्रिकीकरणाला मोठी मागणी आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांना मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबतच्या मार्गदर्शक सूचना येतील. - विजय कोळेकर, प्रकल्प तज्ज्ञ, पोकरा, मुंबई
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान अनुकूल कृषी यांत्रिकीकरणाचा डिसेंबरमध्ये समावेश करण्यात आला असल्याने यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज दाखल होत आहेत. मात्र, या यांत्रिकीकरणाबाबत मार्गदर्शक सूचना नसल्याने आलेले हजारो अर्ज सध्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती मिळाली आहे. 

नानाजी देशमुख प्रकल्पांतर्गत कृषी यांत्रिकीकरण घटकाचा समावेश केल्याबाबत गेल्या डिसेंबर महिन्यात जाहीर झाले. त्यानंतर राज्यात अंमलबजावणी होत असलेल्या या प्रकल्पातील १५ जिल्ह्यांमध्ये लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज दाखल होऊ लागले. कृषी यांत्रिकीकरणासाठी सध्या प्रचलित असलेल्या कृषी विभागाच्या योजनांपेक्षा पोकरातील कृषी यांत्रिकीकरणाला अनुदानाचे पाठबळ अधिक असल्याने प्रत्येक तालुक्यात शेकडोंच्या संख्येत शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झालेले आहेत. मार्गदर्शक सूचना नसल्याने हे अर्ज तूर्त होल्ड करून ठेवण्यात आलेले आहेत.

या प्रकल्पात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व दोन हेक्टरपर्यंत जमीन धारणा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, तसेच दोन ते पाच हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे अर्थसाह्याचे प्रमाण निर्धारीत केले आहेत. ट्रॅक्टरसाठी दोन हेक्टरपर्यंत जमीनधारणा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किमतीच्या ५० टक्के किंवा सव्वा लाख यापैकी कमी असेल ते आणि दोन ते पाच हेक्टरपर्यंत जमीनधारणा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किमतीच्या ४० टक्के किंवा एक लाख यापैकी कमी असेल ते अनुज्ञेय राहील, असे स्पष्ट करण्यात आले.

या योजनेत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे, रीपर, स्वयंचलित फलोत्पादन यंत्रे, सोइंग, प्लांटिंग, रीपिंग व डिगिंग इक्विपमेंट, इंटरकल्टिव्हेशन इक्विपमेंट आदी यंत्रे या प्रकल्पातून शेतकऱ्यांना घेता येणार आहेत. सध्याच्या प्रचलित कृषी योजनांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. पोकरामध्ये हे अनुदान जादा मिळणार असल्याने यासाठी गावागावांतून मागणी अर्ज दाखल होत आहेत. दाखल अर्जांमधून कुठल्या यंत्रांना मान्यता द्यावी, हे यंत्रणा निश्‍चित करणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com