अकोला परिमंडळातील साडेपाच हजारांवर शेतकऱ्यांना मिळतेय दिवसा वीज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  ः सिंचनासाठी पाणी उपलब्ध असूनही केवळ दिवसा वीज उपलब्ध होत नसल्याने रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शेतात पाणी देण्यासाठी जावे लागते. अशा परिस्थितीत अकोला परिमंडळातील तीन जिल्ह्यांतील ५ हजार ६१८ शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कृषिपंपांमुळे दिवसा पिकांना पाणी देणे शक्य झाले आहे. 

शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ३ अश्‍वशक्तीसाठी १६ हजार ५६० रुपये (दहा टक्के), अनुसूचित जाती/जमाती गटातील लाभार्थ्यांना ८ हजार २८० रुपये (पाच टक्के), ५ अश्‍वशक्तीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना २४ हजार ७१० रुपये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती/जमाती गटातील लाभार्थ्यांना १२ हजार ३५५ रुपये (५ टक्के) एवढी रक्कम भरावी लागते.

अकोला परिमंडळाअंतर्गत अकोला जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ६१३ आणि दुसऱ्या टप्प्यातील ३७ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील ४०९ आणि दुसऱ्या टप्प्यातील ५०३ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसविण्यात आले. तसेच वाशीम जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १४२१ आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात ३२५ अशा या परिमंडळातील एकूण ३३८० शेतकऱ्यांच्या शेतात मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत.

या अगोदर राबविण्यात आलेल्या अटल सौर कृषिपंप योजनेत परिमंडळाअंतर्गत असणाऱ्या अकोला जिल्ह्यात ५७७, बुलडाणा ८४१ आणि वाशीम जिल्ह्यात ८९२ असे तीनही जिल्ह्यांत एकूण २३१० सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत.  सौरपंपामुळे दिवसा सिंचन शक्य असून वीजपुरवठा खंडित होण्याचा, विजेच्या कमी दाबाचा प्रश्न राहत नाही. वीज किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे इतर खर्च वाचतो. सौर कृषिपंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी पाच वर्षे तर सौर पॅनलचा कालावधी दहा वर्षांचा आहे. या कालावधीत सौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती व देखभालीसाठी निश्चित केलेल्या कालावधीत संबंधित एजन्सीची विनामूल्य दुरुस्ती करून देण्याची जबाबदारी आहे. सौर कृषिपंपाचा ५ वर्षांसाठी एजन्सीद्वारे विमा उतरविण्यात येतो.

ही योजना तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. टप्पा दोन व तीनचे एकत्रित काम प्रगतिपथावर आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात एकूण ६६७१ सौर कृषिपंप देण्याचे उद्दिष्ट आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com