नागपूर जिल्ह्यात संत्र्याऐवजी मोसंबी लागवडी कल

माझ्याकडेच ६०० संत्री व ६०० मोसंबी झाडे आहेत. मोसंबीला बांबूचा आधार द्यावा लागत नाही. वातावरण कसेही असले तरी हमखास उत्पादनाची हमी मोसंबीत आहे. आंबिया बहारातील मोसंबीला ६० ते ६५ हजाराचा दर मिळाला. याउलट आंबिया संत्री ३० हजार तर आता मृगाच्या संत्र्याला अवघे १२ ते १५ हजार रुपये टनाचे दर आहेत. - वासुदेव राऊत, शिरसावाडी (चिचाळा),ता. काटोल, जि. नागपूर
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर  ः सोपे व्यवस्थापन, तुलनेत मिळणारा अधिक दर यामुळे नागपूर जिल्ह्यात संत्र्याऐवजी मोसंबी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढता, असल्याचे वास्तव कृषी विभागाच्या पाहणीत समोर आले आहे. संत्रापट्टा अशी ओळख असलेल्या काटोल, नरखेड परिसरात हे परिवर्तन अनुभवण्यासारखे असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. कृषी विभागाच्या माहितीनुसार पाच हजार हेक्‍टर तर शेतकऱ्यांचे मते, मोसंबी लागवड दहा हजार हेक्‍टरवर पोचली आहे. 

‘‘नांदेड, जालना या भागात मोसंबी पट्टा होता. त्यामुळेच तेलंगणा, मराठवाडा आणि त्यानंतर विदर्भातील मोसंबी बाजारात येत होती. दुष्काळामुळे मोसंबी लागवड क्षेत्र मराठवाडा आणि तेलंगणामध्ये कमी होत गेले. त्यामुळे बाजारात या भागातील मोसंबीची आवकही पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याचे सांगितले जाते. ही उणीव विदर्भातील मोसंबी उत्पादकांच्या माध्यमातून भागविण्याचे प्रयत्न होत आहे. त्यामुळेच मोसंबीच्या दरातही तेजी अनुभवली जात,’’ असल्याचे मोसंबी उत्पादक वासुदेव राऊत यांनी सांगितले. 

नागपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनीदेखील मोसंबीखालील क्षेत्रात नजीकच्या काळात वाढ होत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत्री लागवड नागपूर जिल्हयात २५ हजार हेक्‍टर तर मोसंबीची लागवड आता ५ हजार हेक्‍टरवर पोचली आहे. शेतकरी मनोज जवंजाळ यांनी तर मोसंबीचे क्षेत्र जिल्ह्यात १० हजार हेक्‍टरपेक्षा अधिक असल्याचा दावा  केला.    ज्युस व प्रक्रियेसाठी मोसंबीला प्राधान्य दिले जाते. व्यवस्थापन संत्र्याच्या तुलनेत सोपी आहे. मोसंबीला टाईट जॅकेट ऑरेंज तर संत्र्याला लुज जॅकेट ऑरेज म्हटले जाते. मोसंबीची टिकवणक्षमता अधिक आहे. सिट्रिक ॲसिडचे प्रमाण संत्र्यात जास्त तर मोसंबीत कमी आहे. त्यामुळे संत्र्यापासून ज्युस करताना साखरेचा वापर अधिक करावा लागतो तर मोसंबीत कमी करावा लागतो , असे   उद्यानविद्या तज्ज्ञ रमाकांत गजभिये यांनी सांगितले    

नागपूर जिल्ह्यात मोसंबी लागवड (अनुदान प्राप्त हेक्‍टरमध्ये)
वर्ष   क्षेत्र 
२०१५-१६ ५४.६ 
२०१६-१७ २३६.७६ 
२०१७-१८  २०८.३ 
२०१८-१९ २१४.९५ 
२०१९-२० २८९.६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com