वाळवा तालुक्यातील महापुराने बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवेखेड, जि. सांगली  : वाळवा तालुक्यात महापुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांची ४२ कोटींची कर्जमाफी लांबणीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ती त्वरित मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दोन लाख रुपयांपर्यंत थकीत कर्जमाफीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आल्याने महापूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी कधी होणार, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. 

वाळवा तालुक्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला महापुराने शेतीचे मोठे नुकसान झाले. महापुरामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली गेली. ऊस, केळी, हळद आदी पिके दहा ते बारा दिवस पाण्याखाली होती. ज्या ठिकाणी महापुराचा फटका बसला नाही, तेथील खरीप पिके अतिवृष्टीमुळे कुजली. सततच्या पावसाने उसाच्या वाढीवर परिणाम होऊन पिकाचे मोठे नुकसान झाले. महापूरबाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करताना बुडालेल्या पिकावरील कर्जाच्या माफीची घोषणा अध्यादेशाद्वारे करण्यात आली.

कृषी विभागाने अतिवृष्टीबाधित शेतीचे पंचनामे मोहीम सलग महिनाभर राबविली. त्रुटींची पूर्तता केली. सहायक निबंधकांनी सोसायट्यांच्या कर्जाची खातरजमा केली. पीक कर्जाची छाननी करून याद्या तयार केल्या. या याद्या सहायक निबंधकांनी जिल्हा उपनिबंधक व जिल्हा बँकेकडे सादर केल्या आहेत. ज्यांचे कर्ज नाही त्यांना तिप्पट दराने भरपाई जमा झाली आहे. सरकार स्थापनेनंतर महापुरातील नुकसानग्रस्त पिकांची कर्जमाफीची रक्कम जमा होईल, अशी आशा होती. 

परंतू, मूळ घोषणेची पूर्तता होण्याआधीच नवीन दोन लाखांपर्यंतच्या थकीत असणाऱ्या कर्जमाफीची घोषणा झाली. तिची पूर्तताही आता अंतिम टप्प्यात आली आहे  त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. पूरग्रत कर्ज यादीत नाव असल्याने मुख्य कर्जमाफी मिळणार नाही. यातच यावर्षी साखर कारखाने उशिरा सुरू झाले आहेत. बदलत्या वातावरणामुळे तोडणीत सातत्य नाही. एफआरपीचे भिजत घोंगडे कायम आहे. कारखान्यांनी कर्जमाफीच्या नावाखाली ऊसबिले पेंडिंग ठेवली आहेत. सध्या सुरू असणाऱ्या शेती कामांसाठी पैसे नाहीत. नवीन कर्ज मिळत नाही, अशा दुहेरी अडचणीत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे महापुराच्या शेती कर्जमाफीची घोषणा कधी होईल, याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com