पूर्व विदर्भात पूरस्थिती कायम; हजारोंचे स्थलांतर

नागपूर : विदर्भात तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र मध्य प्रदेशात तसेच गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्पांमधून विसर्ग सुरुच असल्याने पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सोमवारी (ता.३१) पूरस्थिती कायम होती.
गोंडपिंपरी गावातील नागरिकांचे आंबोरा येथे सैन्य दलाच्या मदतीने स्थलांतर करण्यात आले.
गोंडपिंपरी गावातील नागरिकांचे आंबोरा येथे सैन्य दलाच्या मदतीने स्थलांतर करण्यात आले.

नागपूर  : विदर्भात तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र मध्य प्रदेशात तसेच गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्पांमधून विसर्ग सुरुच असल्याने पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सोमवारी (ता.३१) पूरस्थिती कायम होती. अनेक गावांमध्ये नागरिक अडकल्याने त्यांच्या सुटकेसाठी भारतीय सैन्य दलाची मदत घेण्यात आली. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील हजारो नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. 

गोसेखुर्द सोबतच गोंदिया जिल्ह्यातील कालीसराड, पुजारीटोला, बावनथडी या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग होत असल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील पूरस्थिती कायम असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. 

लाखांदूर, पवनीत पूरस्थिती ‘जैसे थे’ भंडारा जिल्ह्यातील पाच तालुके  शनिवारपासून (ता. २९ ऑगस्ट) टप्प्याटप्प्याने पुराच्या पाण्याखाली आले. रविवारी (ता. ३०) मध्य प्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पासह इतर तीन प्रकल्पांतून विसर्ग सुरू असल्याने वैनगंगा नदीला पूर आला. परिणामी पूरस्थिती आणखीनच गंभीर झाली. त्यामुळे अनेक गावे पाण्याखाली आली तर हजारो नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. सोमवारी (ता. ३१ ऑगस्ट) भंडारा, मोहाडी, तुमसर या तालुक्यातील गावांमधील पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. मात्र लाखांदूर आणि पवनी या तालुक्यातील पूरस्थिती मात्र कायम होती. प्रशासनाने पूरबाधित ग्रामस्थांच्या राहण्याची सोय नजीकच्या शाळांमध्ये केली आहे. प्रशासनाकडून सोमवारीदेखील बचावकार्य सुरू होते.

बचावकार्यात सैन्य दलाची मदत नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. गोंडखेरी परिसरातही पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अकरा हजार नागरिकांना प्रशासनाच्या मदतीने सुरक्षितस्थळी हालविण्यात आले.  राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक त्यासोबतच भारतीय सैन्य दलाची मदत यासाठी घेतली जात आहे. प्रशासनाकडून मदतकार्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे.

ब्रम्हपुरीत पूरस्थिती हाताबाहेर गोंदिया जिल्ह्यातील पूरस्थितीत काही अंशी निवळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र पुराचा कहर कायम असून ब्रह्मपुरी तालुक्यातील स्थिती हाताबाहेर गेली आहे. प्रशासनाकडून पहिल्या दिवशी मदत कार्यात हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. परंतु, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. हेलिकॉप्टरच्या लॕन्डिंगची अडचण निर्माण होत असल्याने सोमवारी त्याचा वापर करण्यात आला नाही असे सांगण्यात आले.

बोटींची संख्या देखील अपुरी असल्याने लहान मुले आणि वृद्धांना पाठीवर घेऊन स्वतः सह त्यांचा जीव वाचविण्याची वेळ पूरग्रस्त भागातील नागरिकांवर आली आहे. त्यातच गेल्या ७२ तासांपासून या भागातील वीजपुरवठा खंडित असल्याने या भागातील नागरिकांना दूरध्वनीव्दारे संपर्क करणेही अशक्य झाले आहे. पूर ओसरल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी  दिली. 

भंडारा शहर जलमय भंडारा शहरात पुराचे पाणी शिरू नये, याकरिता पूर संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. परंतु, वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने भंडारा शहरातील अनेक भाग जलमय झाले. 

गोसेखुर्द प्रकल्पातून विसर्ग गोसेखुर्द प्रकल्पाची पातळी वाढली असल्याने प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या १३ दरवाजे पाच मीटरने तर २० दरवाजे चार मीटरने उघडण्यात आले असून त्याव्दारे ३० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.    ‘मध्य प्रदेश सरकार निष्काळजी’ मध्य प्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग  होत आहे. परंतु, पाणी सोडण्यापूर्वी प्रशासनाने भंडारा, गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला नाही. त्यामुळेच पूर्व विदर्भात पूरस्थिती गंभीर झाल्याचा आरोप विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पुरामुळे या भागात शेतीचे मोठे नुकसान झाले. पशुधन मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी पडले आहे.  त्यासोबतच अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्याची नासाडी तसेच आर्थिक नुकसानही झाले आहे. याला मध्य प्रदेश सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोपही श्री. पटोले यांनी केला आहे.    पिण्यासाठी हवे शुद्ध पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा विळखा आहे.मात्र, ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.  प्रशासनाने शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com