अकोल्यात शनिवारपासून महाराष्ट्र सिंचन परिषद

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  ः  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि सिंचन सहयोग, अकोला यांच्या वतीने शनिवारी (ता. १८) आणि रविवारी (ता. १९) अकोला येथे ‘सिंचन व पाण्याचा कार्यक्षम वापर’ या विषयावर २० वी महाराष्ट्र सिंचन परिषद आयोजित करण्यात आली आहे. 

या सिंचन परिषदेचे उद्‍घाटन शनिवारी सकाळी १० वाजता केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास भाले असतील. आंतरराष्ट्रीय जलसिंचन व जलनिस्सारण आयोगाचे माजी सरकार्यवाह डॉ. माधवराव चितळे, माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर, महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे,  विदर्भ पाटबंधारे विकासचे सचिव तथा कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, तापी खोरे विकास महामंडळाचे सचिव तथा कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी, विद्यापीठाचे कृषी अधिष्ठाता डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती असेल.

असे आहेत सिंचन परिषदेतील कार्यक्रम शनिवार (ता. १८) ः सकाळी १० ते ११.४५ या वेळेत पहिल्या सत्रात उद्‍घाटन सोहळा, पुरस्कार वितरण, विशेष सत्कार व मान्यवरांचे मार्गदर्शन होईल. दुपारी १२ ते १.३० या वेळेत ‘पूर्णा (तापी) खोऱ्यातील खारपाण पट्ट्याचा सिंचन विकास’ या विषयावर संजय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे सत्र होईल. यात डॉ. सुभाष टाले, केशवराव मेतकर, डॉ. पुरुषोत्तम दातकर, सुरेश खानापूरकर, शिवाजीराव देशमुख सहभाग घेतील. तिसरे सत्र डॉ. दत्ता देशकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कारार्थी मनोगतांचे असेल.

यात प्रयोगशील शेतकरी संग्राम देशमुख, प्रयोगशील महिला शेतकरी आदर्श महिला शेतकरी गट (घोटवडे), कै. ल. सी. कोकिळ विशेष सिंचन पुरस्कार, संभाजी कोडक, पुरुषोत्तम देशमुख, राजगोंडा पाटील, सिंचन लेखन पुरस्कार, विमलाताई बेलसरे पुरस्कार विजेते मनोगत व्यक्त करतील. चौथे सत्र दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत ‘सिंचनासाठी नलिका वितरण प्रणाली’ या विषयावर होईल. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे या सत्राचे अध्यक्ष असतील. यात डॉ. संजय दहासहस्र, हरिदास ताठे, डॉ. बापू अडकिने, डॉ. प्रदीप भलगे सहभागी होतील. पाचवे सत्र डॉ. विलास खर्चे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यात विजय जोगळेकर, बी. डी. जडे, डॉ. सुमंत जाधव, डॉ. बी. व्ही. सावजी, डॉ. एस. एम. टाले, दिगंबर गावंडे पाटील सहभागी होतील.

रविवारी (ता. १९) ः सकाळी ९ ते १०.३० या वेळेत सहावे सत्र ‘पाण्याची उपलब्धता व सिंचन विस्तार, पाण्याचा ऱ्हास’ या विषयावर डॉ. शंकरराव मगर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या विषयावर डॉ. राजेश पातोडे, डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. गजानन सातपुते, डॉ. अशोक म्हस्के, चि. वि. वाकोडे सहभागी होतील. सातवे सत्र सकाळी १०.४५ ते ११.४५ या वेळेत ‘आदर्श सिंचन व्यवस्थापनासाठी पाणी वापर संस्थांचा सहभाग व सक्षमीकरण’ या विषयावर होईल. या सत्राच्या अध्यक्षस्थानी अविनाश सुर्वे असतील. या परिसंवादात दादाराव देशमुख, राजेंद्र इंगळे, मनोज तायडे, अविनाश डुडुळ मार्गदर्शन करतील.

आठवे सत्र ‘थेट विक्री व्यवस्था’ या विषयावर ११.४५ ते १२.४५ या वेळेत होईल. प्रा. अ. गो. पुजारी हे सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील. यात अरुणा शेळके, वंदना दाभाडे, अनिल कवळे, शैलेंद्र गाताडे, संतोषी मारणे, अशोक शेवते, रामकिशन गुंड मार्गदर्शन करतील. दुपारी १२.४५ ते १.४५ या वेळेत नववे सत्र होईल. या विशेष मार्गदर्शक सत्राचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव शिंदे असतील. डॉ. प्रसाद देवधर, डॉ. सुधीर भोंगळे, ज्ञानेश्‍वर बोडके या वेळी मार्गदर्शन करतील. सिंचन परिषदेचे समारोपीय सत्र दुपारी १.४५ ते २.३० या वेळेत होईल. डॉ. माधवराव चितळे, डॉ. शंकरराव मगर, डॉ. व्ही. एम.  भाले, डॉ. दि. मा. मोरे, अविनाश सुर्वे, सं. दे. कुलकर्णी, डॉ. बापू अडकिने या वेळी उपस्थित राहतील. डॉ. मोरे या वेळी मागोवा घेतील. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com