रत्नागिरी जिल्ह्यात तीव्र उन्हामुळे कैरीगळ

तीव्र उन्हामुळे झालेली कैरीगळ
तीव्र उन्हामुळे झालेली कैरीगळ

रत्नागिरी  ः गेल्या आठ दिवसांत उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे आंबा बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. किमान आणि कमाल तापमानातील फरक १५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्यामुळे सुपारीपेक्षा कमी आकाराची फळं उन्हामुळे पिवळी पडून गळू लागली आहेत. हे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त आहेत.

लांबलेल्या पावसाने हापूस हंगाम दीड महिन्याने पुढे गेला आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून वाशी मार्केटला जाणाऱ्या पेट्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत अवघी वीस टक्केच आहे. दर वधारलेला असला तरीही दर आठवड्याला बदलणाऱ्या तापमानाचा परिणाम संवेदनशील हापूसवर होत आहे. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे यांना गेल्या चार दिवसांत कातळावरील आंबा बागांमध्ये आलेल्या अनुभवानुसार किमान, कमाल तापमानातील फरक वाढत असल्याचे दिसत आहे. बुधवारी (२६ फेब्रुवारी) दुपारी १२ ते ३ या कालावधीत आंबा बागेमध्ये कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. त्यापूर्वी ते ३८ ते ४० अंशांपर्यंत दाखवत होते. रात्री २० ते २२ अंश तापमान नोंदले गेले आहे.

तापमान, आर्द्रता आणि प्रकाश या तिन्ही नोंदी घेण्यासाठी बागेमध्ये सेन्सर बसविण्यात आला आहे. दर दहा मिनिटांनी त्या सेंसरद्वारे नोंदी मिळतात. गेल्या पाच दिवसांत तापमानातील या बदलांचा परिणाम आंब्यावर होत आहे. कातळावरीलच नव्हे तर किनारी भागातील बागांनाही उन्हाचा चटका बसला आहे. यंदा पाऊस लांबल्यामुळे अजूनही अनेक बागांमध्ये मोहर दिसत आहे. काहींना तर पालवी फुटलेली आहे. जिल्ह्यात सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा बागायती केली जाते. त्यापैकी सुमारे १० टक्केच बागांमध्ये सुपारीएवढी कैरी दिसत आहे. सध्याच्या बदलत्या हवामानाचा परिणाम त्या कैरीवर झाला असून उन्हामुळे ती कैरी गळून पडत आहे. हे प्रमाण सर्वाधिक असल्याने यंदा उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे, असे डॉ. भिडे यांनी सांगितले.

सध्या एक एकर आंबा लागवडीच्या क्षेत्रातील ३० टक्केच झाडांतून उत्पादन मिळेल अशी स्थिती दिसते; मात्र वातावरणातील बदलांमुळे हे प्रमाण हंगाम संपेपर्यंत कमी होईल. गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमान कमी असल्याने कैरी गळीचे प्रमाण कमी असल्याचे बागायतदारांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com