शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणारा व्यापारी गजाआड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक  : जिल्ह्यात विजय मुन्नी राजन या व्यापाऱ्याने श्रीनाथजी ॲग्रो एक्स्पोर्ट लिमिटेड कंपनीमार्फत विविध ठिकाणी कांदा, द्राक्षे खरेदी करून जवळपास ४ कोटी ६१ लाख ४१ हजार ९६५ रुपयांचा परस्पर अपहार करत फसवणूक केली होती. गेल्या दोन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर मंगळवारी (ता. २८) मुंबई येथील राहत्या घरातून पिंपळगाव बसवंत पोलिसांनी सापळा रचत त्याला गजाआड केले आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवपूर (ता. निफाड) येथील कांदा व द्राक्ष व्यापारी अजित लहानू पाटील यांनी पिंपळगाव बसवंत पोलिस स्थानकात २० ऑगस्ट २०१८ ला फसवणूक झाल्याबाबत फिर्याद दिली होती. शेतमाल व्यापारी विजय मुन्नी राजन (३२, रा. वडाळा, मुंबई) व इतर तीन आरोपींनी श्रीनाथजी ॲग्रो एक्स्पोर्ट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून विविध ठिकाणी द्राक्ष, कांदा खरेदी केल्यानंतर विक्रीतून आलेल्या ४ कोटी ६१ लाख रुपयांचा परस्पर अपहार करून फिर्यादीसह शेतकऱ्यांची फसवणूक केली. अनेकदा त्यांच्याशी संपर्क साधून पैशांची मागणी केली. त्या बदल्यात त्यांनी काही धनादेश दिले, मात्र ते वटले नव्हते. यानंतर विचारणा केली असता तो धमक्या देत असे, असे अजित पाटील यांचे म्हणणे आहे.

या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संशयित फरार असल्याने त्याचा पत्ता लागत नव्हता. पोलिसांना गुंगारा देत फरार असलेला संशयित मुंबईत आल्याची माहिती पिंपळगाव बसवंत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक आरती सिंग, अप्पर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलिस उपअधीक्षक अरुंधती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय महाजन पोलिस उपनिरीक्षक युवराज सैंदाने, अमोल जाधव, रमेश पाटील, तुषार झालटे यांचे पथक मुंबईत दाखल झाले. मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन पोलिसांनी सापळा रचून राजन यास अटक केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com