पुणे जिल्ह्यात खरिपात भात, सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज

यंदा चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भात पिकाच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे तीन हजार तर सोयाबीनच्या क्षेत्रात सहा हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सरासरी एवढ्या क्षेत्रावर पेरणी होईल असा विश्वास आहे. - बी. जे. पलघडमल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः हवामान विभागाने चांगला पाऊस होईल असा अंदाज दिल्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार जिल्ह्यात दोन लाख ३० हजार ९३७ हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. यात भात पिकाच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन हजार १०९ हेक्टरने वाढ होण्याचा अंदाज आहे.

गेल्यावर्षी जिल्ह्यात एक लाख ८४ हजार ३६ हेक्टरवर खरीप पेरणी झाली होती. यंदा चांगला पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी एप्रिलपासूनच खरिपाची तयारी सुरू केली आहे. भात पट्ट्यातील शेतकऱ्यांनी सध्या शेती मशागतीची कामे हाती घेतली आहे. काही शेतकऱ्यांनी भाताच्या बियाण्याची उगवणक्षमता तपासून पाहण्याचे काम हाती घेतले आहे.

पूर्व पट्ट्यातील दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, शिरूर भागातही शेतकऱ्यांनी नांगरणीची कामे सुरू केली आहे. जिल्ह्यातील शेतकरी खरिपात भात, ज्वारी, बाजरी, रागी, मका या पिकांची पेरणी करतात. कडधान्यामध्ये तूर, मूग, उडीद, भुईमूग, खरीप तीळ, कारळा, सूर्यफूल, सोयाबीन या पिकांनाही शेतकरी प्राधान्य देतात. भातापाठोपाठ यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी १९ हजार ७२ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ होऊन सुमारे २५ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.    

खरीप पिकांचे नियोजित क्षेत्र (हेक्टर) व अपेक्षित उत्पादन (टन)
पीक पिकांचे क्षेत्र अपेक्षित उत्पादन
भात ६२,५०० १,९०,६२५
खरीप ज्वारी १०२० १०९१
बाजरी ५५,००० ७४,२५०
रागी ४००० ३९८४
मका २५,९५० ७०,७६६
इतर तृणधान्ये ५५०० २०६३
तूर २११२ ११६२
मूग १८,५०० ६९३८
उडीद १८०० १०८०
इतर कडधान्ये ११,००० ४१८०
भुईमूग १६,८७० १८,५५७
खरीप तीळ १४० ४५
कारळा ११०० ३८५
सूर्यफूल ९५ ३८
सोयाबीन ५,००० ४४,२५०
इतर गळीतधान्ये १५० ५०
कापूस १५० ६८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com