गोंदिया जिल्ह्यात भरडाईच्या प्रतीक्षेतील चार लाख क्‍विंटल धान उघड्यावर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

गोंदिया  ः भरडाईसाठी धानाची उचल होण्याची गती मंदावली आहे. परिणामी जिल्ह्यातील हमीभावाने खरेदी केंद्रांवर चार लाख क्‍विंटल धान उघड्यावर पडून आहे. मंगळवारी (ता. २५) झालेल्या गारपीट व पावसाचा फटका या धानाला बसला. त्यानंतरही याप्रश्नी प्रशासनाकडून कोणत्याच उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे.

गोंदिया जिल्ह्यात सध्या धानाची हमीभावाने खरेदी सुरू आहे. १८३५ रुपये हमीभाव त्यात ५०० रुपयांचा बोनस आणि २०० रुपये वाढीव यामुळे धानाचे दर २५०० रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत. परिणामी, शासकीय केंद्रांवर धानाची आवक वाढत आहे. गोंदिया जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान खरेदी केली जात आहे. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेल्या केंद्रांवर आजवर सुमारे ३४ लाख क्‍विंटल धानाची खरेदी झाली आहे. आदिवासी विकास महामंडळाकडे धान ठेवण्यासाठी गोदामांची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांनी खरेदी केलेले धान केंद्रांवर तसेच उघड्यावर पडून आहे. परिणामी, धानाची चोरी आणि पावसामुळे नुकसान होण्याचे प्रकार दरवर्षीचेच झाले आहे. यंदा हीच वेळ जिल्हा मार्केटिंग फेडरेशनवर आली आहे.

आत्तापर्यंत २४ लाख क्‍विंटल धान खरेदी फेडरेशनकडून झाली. यापैकी १३ लाख क्‍विंटल धान भरडाईसाठी करार केलेल्या २८६ राईस मिलकडे पाठविण्यात आले आहे. फेडरेशनकडे केवळ आठ लाख क्‍विंटल धान साठविण्याची क्षमता असलेले गोदाम आहे. एफसीआयच्या गोदामात गेल्या वर्षी खरेदी केलेल्या धानापैकी ६० हजार टन तांदूळ पडून होता. त्यातील २० हजार टन तांदळाची उचल करण्यात आली. उर्वरित ४० हजार टन तांदूळ गोदामात पडून असल्याने नवीन भरडाई केलेला तांदूळ साठविण्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याचे सांगितले जाते. परिणामी ६६ केंद्रांवर चार लाख क्‍विंटल धान उघड्यावर पडून असल्याची विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.    नुकसानभरपाई कोण देणार? जिल्ह्यात ६६ केंद्रांवर धान खरेदी मंदगतीने होत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भरडाईसाठी असलेले धान आणि शेतकऱ्यांचे विक्रीच्या प्रतीक्षेत असलेले धान उघड्यावर असल्याने अवकाळी पावसाचा त्याला फटका बसण्याची शक्‍यता आहे. यामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई कोण देणार? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com