‘पोकरा’ प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळेना

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती  ः सरपंचांच्या माध्यमातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा आढावा आज (ता. ६) कृषिमंत्री दादा भुसे घेणार आहेत. जागतिक बॅंकेच्या निधीतून राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला अद्यापही अपेक्षित गती मिळालेली नाही. त्यामुळे बैठक वादळी ठरण्याची शक्‍यता आहे. 

जागतिक बॅंकेच्या निधीतून यापूर्वी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये कृषी समृद्धी प्रकल्प राबविण्यात आला होता. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत प्रभारी तसेच पूर्णवेळ संचालकांनी शेतकऱ्यांऐवजी स्वतःचेच हित साधण्याला प्राधान्य दिले. चौकशीअंती याचा खुलासा झाल्यानंतर शासनाने तत्कालीन प्रकल्प संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तत्कालीन प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांना अटकही करण्यात आली. त्यानंतर राज्यात हवामानबदलाच्या पार्श्‍वभूमीवर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) राबविला जात आहे.

गेल्या वर्षभरापासून अंमलबजावणी होत असलेल्या या प्रकल्पाची गती संथ आहे. परिणामी, प्रकल्पात समाविष्ट शेतकरी त्रस्त आहेत. या प्रकल्पातील ऑनलाइन प्रक्रिया वेळकाढू असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकल्पाची वाटचालदेखील ‘केम’ सारखीच होते की काय, अशी भीती (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी उपस्थित केली आहे.  

दरम्यान, कृषिमंत्री दादा भुसे तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. गुरुवारी ते अमरावती येथे पोकरा प्रकल्पाचा आढावा घेतील. दुपारी साडेतीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे प्रकल्पात समाविष्ट गावांच्या सरपंचांच्या उपस्थितीत ही बैठक होईल, असे सूत्रांनी सांगितले. 

`प्रकल्प कुचकामी ठरणार` आत्महत्याग्रस्त त्यातही मुख्यत्वे पश्‍चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल अशा तरतुदींचा अंतर्भाव पोकरात होता. बहुभूधारक शेतकऱ्यांना ७५ तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८० टक्‍के अनुदान यांत्रिकीकरणाकरिता मिळण्याची देखील तरतूद या प्रकल्पात होती. मजुरांना शेळ्या, मेंढ्या तसेच गोठा बांधकामाकरिता देखील अनुदान मिळणार होते. शेततळ्यालाही अनुदानाची सोय होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबींचा अंतर्भाव करून घेतला. परंतु या बाबीच वगळण्यात आल्याने हा प्रकल्प कुचकामी ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com