पोकरा प्रकल्पाचे ग्रामस्तरावरील कामकाज ठप्प

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पोकरा) प्रमुख जबाबदारी गावपातळीवर कृषी सहायकांकडे आली असून, त्यांच्याकडे आर्थिक व्यवहार व त्यांचे दस्तऐवज, नोंदी सांभाळण्याची जबाबदारीसुद्धा देण्यात आली. कर्मचाऱ्यांना कामकाजात येत असलेल्या अडचणी सोडविण्याच्या मागणीसाठी प्रकल्प राबविला जात असलेल्या १५ जिल्ह्यांतील कृषी सहायकांनी प्रकल्पाच्या कामांवर १२ डिसेंबर २०१९ पासून बहिष्कार टाकला आहे. मागण्यांबाबत अद्याप कोणाताही तोडगा निघाला नसल्याने योजनांची अंमलबजावणी ठप्प झाली आहे.

राज्यात निवडक १५ जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविला जात आहे. प्रकल्पामध्ये विविध घटकांचा समावेश आहे. प्रकल्प अंमलबजावणीची मुख्य धुरा कृषी सहायकांवर आहे. मात्र, कृषी विभागाशी निगडित नसलेल्या बाबींचीदेखील अंमलबजावणी करण्याची वेळ कृषी सहायकांवर आल्याचा आरोप हे कर्मचारी सातत्याने करीत आहेत. प्रकल्पाचे काम करताना येत असलेल्या अडचणींसंदर्भात वारंवार कृषिमंत्री, कृषी आयुक्त, पोकरा प्रकल्पाचे प्रमुख यांच्याकडे चर्चेद्वारे, निवेदनाच्या माध्यमातून मुद्दे मांडण्यात आले. वेळोवेळी आश्वासने देण्यात आली. मात्र, त्याबाबत ठोस निर्णय घेतला नसल्याने कर्मचाऱ्यांनी महिभरापासून कामांवर बहिष्कार टाकला आहे.  

या प्रकल्पाचा मुंबईत मुख्य कक्ष असून, तेथील अधिकारी कुठलाही बदल करण्यासाठी उत्सुक नसल्याने कृषी सहायकांच्या मागण्या कायम आहेत. जोपर्यंत या कक्षातून बदल केला जात नाही तोवर हा लढा मागे घेतला जाणार नसल्याचे कृषी सहायक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

या प्रकल्पाची आखणी करताना कृषी विभागाच्या कार्यपद्धतीची जी साखळी आहे तीच मुळात तोडण्यात आली. उपविभागीय कृषी अधिकारी नोडल अधिकारी असून, त्यानंतर सर्व कामे कृषी सहायकांकडे आहेत. वास्तविक, कृषी विभागाच्या योजना राबविताना तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक यांना जबाबदाऱ्या दिलेल्या असतात. 

ठिबक सिंचन, तुषार सिंचनासाठी मोका तपासणीचे काम कृषी पर्यवेक्षक करतात. यांत्रिकीकरणाची तपासणी मंडल कृषी अधिकाऱ्यांमार्फत होते. परंतु, या योजनेत ही कामे कृषी सहायकाला करावी लागतात. एवढेच नव्हे तर कृषी सहायकाला ग्रामसंजीवनी समितीमध्ये आर्थिक व्यवहार व प्रशासकीय कामकाज पार पाडण्यासाठी जबाबदारीही देण्यात आली. याबाबतचे दफ्तर सांभाळणे, दैनंदिनी रोखपुस्तिका ठेवण्याच्या कामाला मुख्य आक्षेप घेण्यात आला आहे. हे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी मुंबईतील पोकरा कक्षाची असल्याचे कृषी सहायकांचे म्हणणे आहे.   पुन्हा आश्वासन; पण अंमलबजावणी नाहीच सध्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २१ डिसेंबरला वनामती, नागपूर येथे कृषी सचिवांनी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कृषी सहायक संघटना व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या कामकाजात सुचविलेले बदल करण्यास संमती दर्शविली आहे. या संदर्भात सविस्तर सूचना काढण्याचे निर्देश प्रकल्प व्यवस्थापन कक्षाला देण्यात आले आहेत. परंतु, अद्याप काही सूचना निघाल्या नसल्याने कृषी सहायक बहिष्कार मागे घेण्याच्या मानसिकतेत नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com