दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी शरद पवार यांच्याकडून बैठक

जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि खात्याचे सचिव आय. एस. चहल यांच्याकडून दमणगंगा-पिंजाळ व नार-पार-दमणगंगा-तापी-गोदावरी या नदीजोड या आंतरराज्य योजनांबद्दल सविस्तर माहिती घेतली; तसेच वैतरणा-उल्हास खोऱ्यांचे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात सोडून मराठवाडा विभागातील टंचाईग्रस्त भागाकडे कसे वळवता येईल आणि एकूणच टंचाईग्रस्त भागाकडे पश्चिम वाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी वळवून दुष्काळावर कायमचा तोडगा शोधण्याबाबत मंत्र्यांकडे आग्रह धरला. - शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री.
दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी शरद पवार यांचा पुढाकार
दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी शरद पवार यांचा पुढाकार

मुंबई : दुष्काळग्रस्त मराठवाड्याची तहान कायमस्वरूपी कशी भागवता येईल, यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि प्रधान सचिव आय. एस. चहल यांच्यासह जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत श्री. पवार यांनी संबंधितांना याअनुषंगाने मार्गदर्शन आणि सूचना केल्या आहेत. 

येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शनिवारी (ता.११) ही बैठक पार पडली. कायम दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना प्रामुख्याने पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने दमणगंगा-पिंजाळ व नार-पार-दमणगंगा-तापी-गोदावरी या नदीजोड प्रकल्पाची सद्यस्थिती आणि या प्रकल्पाला गती देण्यासाठी काय करता येईल, यावर बैठकीत ऊहापोह झाल्याचे सांगण्यात आले. 

केंद्र सरकारने १९८० मध्ये तयार केलेल्या नॅशनल परस्पेक्टिव्ह प्लॅनमध्ये देशातील एकूण ३० आंतरराज्यीय नदीजोड योजनांची आखणी करण्यात आली. या योजनांपैकी महाराष्ट्र व गुजरात राज्यांमधील दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा या दोन आंतरराज्यीय योजना प्रस्तावित आहेत. त्यानुसार केंद्रातर्फे प्रस्तावित दोन आंतरराज्यीय व महाराष्ट्र राज्याअंतर्गत चार नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून प्रस्तावित करून त्यानुसार महाराष्ट्र, गुजरात व केंद्र सरकार यांच्यात करायच्या सामंजस्य कराराचा मसुदा केंद्र सरकारला सादर झाला आहे.

या करारानुसार आंतरराज्यीय नदीजोड प्रकल्पातील दोन्ही राज्यांमधील प्रस्तावित पाणीवाटपाबाबत गुजरात सरकारने अद्यापही सहमती दिलेली नाही. राज्याच्या मुख्य सचिव स्तरावरून या वाटाघाटी सुरू आहेत; तसेच प्रस्तावित पार-तापी-नर्मदा व दमणगंगा-पिंजाळ या नदीजोड प्रकल्पातील दोन्ही राज्यांतील पाणीवाटपाच्या गुंतागुंतीमुळे महाराष्ट्राचे पाणी गुजरातला दिले जात आहे, असा आरोप झाल्याने या प्रकल्पालाही विरोध होत आहे.

वास्तविक, दमणगंगा-पिंजाळ या प्रकल्पातून मुंबई शहराला पिण्यासाठी ५७९ दशलक्ष घनमीटर, नार-पार-गिरणा प्रकल्पातून तुटीच्या तापी खोऱ्यात (गिरणा) ३०५ दशलक्ष घनमीटर, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी व पार-गोदावरी नदीजोड प्रकल्पातून दुष्काळी गोदावरी खोऱ्यात ४४२ दशलक्ष घनमीटर, उर्ध्व वैतरणा प्रकल्पातून दमणगंगा-पिंजाळ प्रकल्प पूर्ण झाल्यावर गोदावरी खोऱ्यात अतिरिक्त २८३ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होऊ शकते.

मात्र, विविध कारणांमुळे केंद्र, गुजरात व महाराष्ट्र सरकारच्या पातळीवर होत असलेल्या दिरंगाईमुळे ही प्रस्तावित नदीजोड योजना रखडली आहे. त्यामुळे आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्याअंतर्गत नार-पार-गिरणा, पार-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प गुजरात व केंद्र शासनासोबत सामंजस्य करार करून राष्ट्रीय प्रकल्प म्हणून राबविण्याऐवजी राज्याअंतर्गत प्रकल्प म्हणून दीर्घकालीन मुदतीचे किमान व्याजदराने निधी उभारून राबविणे आवश्यक आहे; तसेच हे नदीजोड प्रकल्प पिण्याच्या पाण्यासाठी तसेच तुटीच्या खोऱ्यातील भागासाठी असल्यामुळे हे विशिष्ट प्रकल्प राबविण्यासाठी या प्रकल्पांना राज्यपालांच्या निधीवाटपाच्या सूत्राबाहेर ठेवता येणे शक्य असल्याचे सांगितले जाते. गोदावरी खोऱ्यात २५ टीएमसी पाणी वळवणे शक्य विशेषतः दमणगंगा-पिंजाळ पूर्ण झाल्यावर उर्ध्व वैतरणा प्रकल्पातून गोदावरी खोऱ्यात अतिरिक्त २८३ दशलक्ष घनमीटर (१० अब्ज घनफूट) पाणी देणे शक्य आहे. त्यामुळे गोदावरील खोऱ्यात एकूण २५.६० टीएमसी पाणी वळवणे शक्य होणार आहे. यामुळे कायम दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com