तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी दिल्लीत आंदोलन करणार : अनिल घनवट

चांदवड येथील कांदा परिषदेत सहभागी झालेले मान्यवर
चांदवड येथील कांदा परिषदेत सहभागी झालेले मान्यवर

चांदवड, जि. नाशिक  : कांद्याप्रमाणेच सर्व शेतीमालाचे भाव पाडण्याचे धोरण सत्तेत आलेल्या सर्व राजकीय पक्षांनी राबवले आहे. सर्व शेतीमाल निर्बंधमुक्त करून शेतकऱ्यांना व्यापाराचे स्वातंत्र्य द्यावे, तसेच जगात उपलब्ध असलेले शेतीसाठीचे तंत्रज्ञान वापरण्याचे स्वातंत्र्य मिळावे, यासाठी एप्रिल महिन्यात देशभरातील शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीत आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी केली.

चांदवड (जि. नाशिक) येथे रविवारी (ता. १) शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेची कांदा परिषद झाली. या वेळी ते बोलत होते. परिषदेस सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, राज्य संपर्कप्रमुख कुबेर जाधव, महिला आघाडी अध्यक्षा सीमा नरोडे, सतीश दाणी आदी उपस्थित होते.

या वेळी विलास शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचा सल्ला दिला. एकीकडे बाजारात कांद्याची आवक वाढत असताना, तर दुसरीकडे दर कोसळत असताना कांद्यावरील निर्बंध हटविण्यास केंद्र शासन तयार नाही याबाबत परिषदेत वक्त्यांनी टीका केली. तमिळनाडू व आंध्रप्रदेशातील कांदा निर्यातीस केंद्राने परवानगी दिली; मात्र महाराष्ट्रातील कांद्याच्या निर्यातीला परवानगी नाकारून राजकारणातील उट्टे काढण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास तयार नसेल तर देशातील शेतकरीविरोधी सरकारलासुद्धा घरी पाठवण्याची तयारी शेतकऱ्यांनी करावी, असे आवाहन श्री. घनवट यांनी केले. शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या व किसान समन्वय समितीच्या बैठकीत होणाऱ्या आंदोलनाची तारीख ठरविण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.  परिषदेचे प्रास्ताविक नाशिक जिल्हा अध्यक्ष अर्जुन बोराडे यांनी केले. या वेळी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष देविदास पवार, संतू पाटील झांबरे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन शंकर पुरकर यांनी केले.

परिषदेतील ठराव

  • सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण अवलंबावे.
  • कांद्याचे भाव नियंत्रित करण्यासाठी निर्यातबंदी, साठ्यांवरील मर्यादा, वाहतुकीवरील मर्यादा, परदेशातून महाग कांद्याची आयात अशी उपाययोजना करू नये.
  • कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप कायमस्वरूपी बंद करावा.
  • कांद्यावर प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी जमीन बिनशेती करण्याची अट न ठेवता, नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यात यावी.
  • कांद्यावर प्रक्रिया करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांना वित्त संस्थांकडून पुरेसे भांडवल पुरवण्यात यावे. 
  • शेतीला सिंचनाच्या सुविधेसह दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा.
  • देशातील कांदा लागवड व उत्पादनाची अचूक माहिती वेळेवर उपलब्ध व्हावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com