संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे जिल्ह्यात ऊसरोपांची टंचाई

उसाच्या तयार रोपांची लागवड केल्यास त्यांची चांगली वाढ होत असल्याने शेतकऱ्यांकडून रोपांना मागणी वाढली आहे. तीन ते चार महिन्यांपासून रोपांना चांगली मागणी आहे. - बाळू भुजबळ, रोपवाटिका चालक.

पुणे  ः यंदा चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यात ऊस लागवडी सुरू आहेत. मात्र ऊस लागवडीसाठी अनेक ठिकाणी ऊसरोपांची टंचाई भासत आहे. लागवडीसाठी शेतकऱ्यांनी ऊसरोपांवर भर दिल्याने बहुतांश रोपवाटिका व्यावसायिकांची ऊसरोपे तयार करण्याची लगबग सुरू झाल्याचे चित्र आहे.

सुरू उसाची लागवड डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत केली जाते; परंतु लागवडीचा योग्य कालावधी १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी हा आहे. या उसाची तोडणी साधारणपणे १२ ते१४ महिन्यांनी केली जाते. उसाचे उत्पादन हवामानावर अवलंबून असते. डिसेंबर ते फेब्रुवारी याकाळात तापमान कमी असते. त्यामुळे ऊस उगवणीस एक ते दीड महिन्याचा कालावधी लागतो. सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; परंतु साखर कारखाने सुरू असल्याने शेतकऱ्यांना ऊसरोपे बनविण्यासाठी उसाची टंचाई भासू लागल्याने ऊसरोपे तयार होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने अशा ठिकाणचे शेतकरी अजूनही सुरू ऊस लागवडी करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी रोपवाटिकाधारकांकडे रोपांची मागणी करत असून ही मागणी पूर्ण करण्यासाठी रोपवाटिका चालकांची उसाचे चांगले बेणे प्लॉट शोधण्याची धडपड सुरू आहे. ऊस बेण्याची कमतरता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांकडून जास्त दराने उसाचे प्लॉट खरेदी करण्यात येत आहेत. त्यामुळे सप्टेंबर बेणे प्लॉटसाठी विक्री होणाऱ्या उसाची किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले. गेल्या वर्षी तीन हजार रुपये टनाने मिळणारा ऊस आता चार हजार रुपयांपर्यंत पोचला आहे. रोपे तयार करण्यासाठी ऊस बेणे कमी पडत आहे. जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, जुन्नर या तालुक्यांमध्ये रोपवाटिकांचे जाळे पसरले आहे. विशेषकरून शेतकऱ्यांनी पूरक उद्योग म्हणून ऊस रोपवाटिका करण्याकडे प्राधान्य दिल्याचे दिसून येते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com