ज्वारीचे पीक अकाली सुकले; नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील चित्र

आमच्या भागात सुरुवातीला पेरणी केलेल्या ज्वारी पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. खराब झालेला कडबा जनावरे खात नाहीत. यंदा पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे; परंतु किडींमुळे ज्वारीचे मोठे नुकसान झाले. - ज्ञानेश्वर माटे,शेतकरी, अर्धापूर, जि. नांदेड.
ज्वारीचे पीक अकाली सुकून गेले आहे
ज्वारीचे पीक अकाली सुकून गेले आहे

नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ज्वारी पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पाने अकाली सुकून गेली आहेत. त्यामुळे कडब्याची (चारा) प्रत खराब झाली आहे. धान्य उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. ज्वारी पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात १ लाख ७० हजार १५७ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील ३० हजार ३५१, परभणी जिल्ह्यातील १ लाख २७ हजार ३६३, हिंगोली जिल्ह्यातील १२ हजार ४४३ हेक्टर क्षेत्रावरील ज्वारीचा समावेश आहे. मुगाच्या काढणीनंतर अनेक शेतकऱ्यांनी आॅक्टोबर महिन्यात ज्वारीची पेरणी केली. त्यानंतर पाऊस सुरू होता. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडल्या. आॅक्टोबर महिन्यात पेरणी केलेले ज्वारीचे पीक निसवून पडले आहे; परंतु हवामानात होत असलेल्या अचाकन बदलामुळे ज्वारीवर माव्याचा प्रादुर्भाव झाला; तसेच पानांवर काळ्या बुरशीची वाढ होऊन ती अकाली सुकून गेली.  

कणसातील दाणे परिपक्व होण्याच्या अवस्थेत पाने वाळल्यामुळे दाणे भरणार नाहीत. परिणामी, धान्य उत्पादनात मोठी घट येणार आहे. कडब्याची (चारा) प्रत खराब झाली आहे. धान्याची प्रतदेखील खालावली आहे. याआधी अनेक भागांत अमेरिकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे ज्वारी पिकाचे नुकसान झाले. यंदा ज्वारी पिकासाठी जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा आहे. सिंचनासाठी पाणीदेखील आहे; परंतु कीड-रोगांमुळे नुकसान झाल्यामुळे धान्य; तसेच चारा उत्पादनात घट येणार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मावा, तसेच काळी बुरशीमुळे ज्वारीची पाने वाळून गेली असल्याने धान्य, चारा उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषीविद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com