खत घोटाळाप्रकरणी पणन महासंघाचे सरव्यवस्थापक यादव निलंबित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : महाराष्ट्र राज्य पणन महासंघात झालेल्या खत घोटाळ्यातील महासंघाचे सरव्यवस्थापक एन. बी. यादव यांचे निलंबन करण्याची घोषणा पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत केली. तसेच श्री. यादव यांना वाचविण्याचा प्रयत्न केला म्हणून महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक जे. पी. गुप्ता यांचीही चौकशी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

शिवसेनेच्या डॉ. मनीषा कायंदे यांनी शनिवारी (ता. १४) यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. सातारा व उस्मानाबाद येथे पाच कोटींचा खत घोटाळा झाला असून, सरव्यवस्थापक यादव दोषी आढळले असल्याने त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी शेकापचे जयंत पाटील यांनी केली.  दरम्यान, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अनेक अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्यानंतर ते पुन्हा त्याच विभागात जाऊन कामावर रुजू होतात, त्यामुळे ते त्या जागेवर पुन्हा येणार नाहीत, यासाठी काही खबरदारी घ्यावी, अशी सूचना केली. त्यावर पणनमंत्र्यांनी निलंबित केलेले अधिकारी पुन्हा त्याच जागेवर येऊ नये यासाठी सामान्य प्रशासन विभागाला सूचना देण्यात येतील, असे सांगितले.

त्याआधी यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, की सातारा व उस्मानाबाद येथील खते येणे बाकीच्या अनुषंगाने एन. बी. यादव यांची खातेनिहाय चौकशी झाली असून, त्यामध्ये ते दोषी आढळले आहेत. अहवालामध्ये त्यांच्यावर कडक कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही न्यायालयाने एन. बी. यादव यांच्या बाजूने निकाल दिलेला नसताना तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक जे. पी. गुप्ता यांनी न्यायालयाचे आदेश बाजूला सारून एकतर्फी यादव यांना कामावर रूजू करून घेतले आहे. सातारा व उस्मानाबाद जिल्ह्यात उधार खत विक्रीपोटी अद्यापही ५ कोटी येणे बाकी आहे, याला पणन महासंघाचे तत्कालीन सरव्यवस्थापक एन. बी. यादव जबाबदार असतानाही इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ करून एन. बी. यादव यांना दोषमुक्त केले आहे. तसेच क्लार्क, लेखापाल यांची चौकशी सुरू केली आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी असल्याचे श्री. दरेकर यांनी सांगितले.

आयपीएल कंपनीकडून एक हजार मेट्रिक टन पोटॅश एन. बी. यादव हे सरव्यवस्थापक असताना खरेदी करण्यात आले आहे. हे खत परस्पर मेसर्स पारसेवार सीड्स अॅण्ड फर्टिलायझर्स, नांदेड यांना दिले आहे. यामध्ये पणन महासंघाची तीन कोटीहून जास्त रक्कम गुंतून राहिलेली आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com