पंतप्रधान मोदी यांच्याकडून संशोधक शेतकरी राजेंद्र जाधव यांचा गौरव

या यंत्राव्दारे संपूर्ण गावाची स्वच्छता होऊ शकते.या कामामध्ये मानवी हस्तक्षेपाची कमी प्रमाणात आवश्यकता भासते. -राजेंद्र जाधव,यंत्राचे निर्माते.
यशवंत यंत्राच्या निर्मितीत व्यस्त असलेले संशोधक शेतकरी राजेंद्र जाधव.
यशवंत यंत्राच्या निर्मितीत व्यस्त असलेले संशोधक शेतकरी राजेंद्र जाधव.

नाशिक : जिल्ह्यातील वऱ्हाणे (ता.बागलाण) येथील संशोधक शेतकरी राजेंद्र जाधव यांनी ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी अनोखे सॅनिटायझर फवारणी यंत्र विकसित केले आहे. या उल्लेखनीय निर्मितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात श्री. जाधव यांचा गौरव केला आहे.

कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत संशोधित सॅनिटायझर यंत्रामुळे कोरोना निर्मूलन कार्यास बळ मिळाले आहे. मनुष्यबळाचा वापर न करता झपाट्याने फैलावत असणाऱ्या ‘कोरोना’वर मात करणे शक्य होणार आहे. श्री.जाधव यांनी त्यांच्या शेतातील पिकांवर फवारणीसाठी यंत्र तयार केले होते. त्या यंत्राची उपयुक्तता तपासून ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे यंत्र सटाणा नगरपरिषदेला वापरासाठी दिले. आरोग्य खात्याच्या मानकांप्रमाणे या यंत्रामुळे कोरोना निर्जंतुकीकरणाच्या कामाला मोठे बळ मिळाले. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या कठीण परिस्थितीत आत्मनिर्भर भारतासाठी योगदान ठरलेल्या या यंत्राची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून श्री.जाधव यांच्या संशोधन कार्याचा गौरवास्पद उल्लेख केला आहे.

अशी झाली ‘यशवंत’ची निर्मिती अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेतलेले राजेंद्र जाधव यांनी ग्रामीण भागात सार्वजनिक स्वच्छता करण्यासाठी स्व-अध्ययनातून यंत्र विकसित करण्याबाबत संशोधन सुरू केले. यासाठी त्यांनी शेतीच्या कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीचा प्राधान्याने विचारपूर्वक वापर केला. अवघ्या २५ दिवसांमध्ये ट्रॅक्टरवर बसवता येवू शकेल, अशी नावीन्यपूर्ण फवारणी यंत्रणा विकसित केली. या यंत्राचे नाव त्यांनी ‘यशवंत’ ठेवले आहे. या फवारणी यंत्राच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर रस्ते, सोसायट्या, दारे, कुंपणाच्या भिंती अगदी स्वच्छ धुवून काढणे शक्य होत आहे.

अशी आहे यंत्राची रचना

  • या फवारणी यंत्रामध्ये एकमेकांच्या विरुद्ध दिशेला ॲल्युमिनियमची दोन पाती बसवण्यात आली आहेत.
  • दोन्ही पाती विरुद्ध दिशेने हवा शोषून घेतात व नोझलमधून उच्च दाबाने निर्जंतुकीकरणाच्या द्रावाच्या तुषारांचे सिंचन सर्व दिशांना होते.
  • ही पाती १८० अंशाच्या कोनामध्ये फिरतात.
  • जमिनीपासून १५ फूट उंचीपर्यंतच्या भिंतीचीही स्वच्छता करण्यास ती सक्षम आहेत.
  • या फवाऱ्याव्दारे स्वच्छता, निर्जंतुकीकरणासाठी १५ अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरचा वापर केला जाऊ शकतो.
  • यंत्रातील टॅंकरमध्ये एकावेळेस ६०० लीटर द्रावण ठेवण्याची सुविधा आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com