नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
अॅग्रो विशेष
शिरोळमधील पूरबाधित जमिनींमध्ये वाढले उपयुक्त घटक
पूर येऊन गेल्यानंतर जमिनीचे किती नुकसान होऊ शकते किंवा फायदा होऊ शकतो हे पाहण्यासाठी आम्ही प्रयोगशाळेमार्फत शिरोळ तालुक्यातील पूरबुडित क्षेत्रातील मातीची तपासणी केली. या अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना व्यवस्थापन करणे सोपे जाणार आहे.
- गणपतराव पाटील, अध्यक्ष श्री दत्त साखर कारखाना, शिरोळ
कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी दक्षिण महाराष्ट्राला महापुराने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची हानी झाली. परंतु महापूर येऊन गेल्यानंतर त्यात बुडलेल्या जमिनींमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. शिरोळ तालुक्यातील जमिनींमध्ये पिकांच्या वाढीसाठी असणारे उपयुक्त घटक दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. त्याचा फायदा भविष्यात या तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या प्रयोगशाळेने पुरानंतर पूरबाधित क्षेत्रातील दोनशे ठिकाणांहून मातीचे नमुने घेऊन त्यांचे पृथक्करण केले. त्यानंतर याबाबी स्पष्ट झाल्या आहेत.
जमिनीची क्षारता घटली
पूर येण्यापूर्वी ज्या शेतजमिनींची आरोग्य पत्रिका श्री दत्त कारखान्याकडे उपलब्ध होती. त्याच शेतजमिनींची तपासणी पुन्हा पुरानंतर करण्यात आली. पूर जाऊन वाफसा आल्यानंतर पंधरा दिवसांच्या अंतराने मातीचे नमुने प्रयोगशाळेच्या कर्मचाऱ्यांनी तपासले. यानंतर जमिनीच्या घटकांमध्ये अपवाद वगळता सकारात्मक बदल झाल्याचे दिसून आले. जमिनीतील क्षार मोठ्या प्रमाणात निघून गेल्याचे दिसून आले. तसेच सेंद्रिय कर्ब, पोटॅश, फेरस, मॅंगेनीज या घटकांत वाढ झाली. यामुळे भविष्यातील पिकांना त्याचा लाभ होऊ शकत असल्याचे प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांनी सांगितले. वाहत्या पाण्यामुळे स्फुरद व जस्त काही प्रमाणात कमी झाले असले, तरी वाढलेल्या घटकांच्या तुलनेत या घटकांचा कमीपणा फारसा गंभीर नसल्याने तज्ज्ञांनी सांगितले.
खताचा वापर कमी होणार
येथून पुढील काळात जे घटक मिळविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करावा लागणार होता, ते घटक पुराच्या गाळातून आल्याने रासायनिक खतांचा वापर कमी प्रमाणात होणार आहे. शेतकऱ्यांनी ठराविक कालखंडानंतर माती परीक्षण करून घेतल्यास खत मात्रा कमी कराव्या लागतील. त्यामुळे उत्पादन खर्चात काही प्रमाणात बचत होईल, असा विश्वास प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी व्यक्त केला.
जास्त दिवस पाणी साचून राहिल्याने शेतांमध्ये गाळ तसाच राहिला. यामुळे उपयुक्त घटकांमध्ये दहा ते पंधरा टक्के वाढ दिसून आली. नमुने घेतलेल्या जवळ ९५ टक्के शेतकऱ्यांच्या शेतजमिनींमधील माती नमुन्यात ही वाढ दिसून आली. जमिनीच्या वरच्या भागातील क्षार जास्त प्रमाणात वाहून गेल्याने याचा फायदा पुढच्या पिकांना होणार असल्याचे श्री दत्त कारखान्याचे माती परीक्षण अधिकारी ए. एस. पाटील यांनी सांगितले.