विदर्भात आज हलक्या पावसाची शक्यता

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः मध्य प्रदेश आणि हरियाणा परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे आज (ता.९) विदर्भात ढगाळ हवामान राहून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा भागातही काही अंशी ढगाळ हवामान राहील. शुक्रवारी (ता.१०) राज्यात हवामान कोरडे राहणार असून थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.  

विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला भागात बुधवारी (ता. ८) हलका पाऊस झाला. अमरावतीतील नेरपिंगळाई, चांदूरबाजार परिसरात गारपीट झाल्याने शेतकरी पुन्हा धास्तावले आहेत. वाशीम, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर या भागात काही अंशी हवामान ढगाळ होते. बुधवारी (ता. ८) सकाळी ब्रह्मपुरी येथे १२.१ अंश सेल्सिअस अशी सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाच्या काही भागात ढगाळ हवामान आहे. यामुळे बहुतांशी भागात थंडी गायब झाली असून किमान तापमानाच वाढ झाली आहे.

विदर्भाच्या काही भागात बुधवारी सकाळपासून हवामानात बदल होत होते. दुपारनंतर अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला. त्यामुळे हवेत काही प्रमाणात गारवा तयार झाला होता. ढगाळ हवामानामुळे या भागात किमान तापमानात चढउतार होत आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा १२ अंश सेल्सिअसवर गेला आहे. वाशीम, वर्धा, नागपूर, अकोला, यवतमाळ या भागात थंडी कमी झाली आहे. याभागात किमान तापमानाचा पारा १४ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. मराठवाड्यातही थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. औरंगाबाद, परभणी, नांदेड भागात किमान तापमानाचा पारा १४ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता.

कोकणात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढले होते. मुंबई, सांताक्रुझ, अलिबाग, रत्नागिरी भागात २० ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमान होते. मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे असल्याने किंचित थंडी होती. काही भागात ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली होती. नाशिक, जळगाव, पुणे, मालेगाव, सातारा, सांगली, सोलापूर भागात किमान तापमान १५ ते २१ अंश सेल्सिअस दरम्यान होते.

बुधवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई २१.०, सांताक्रुझ २०.८, अलिबाग २१.५, रत्नागिरी २३.६, पुणे १७.४, नगर १७.६, अकोला १६.९, औरंगाबाद १४.८, नांदेड १४.०, जळगाव १८.६,  कोल्हापूर २०.३, महाबळेश्वर १५.९, नागपूर १५.९, नाशिक १६.०, मालेगाव १७.८, निफाड १२.०, परभणी १९.०, सांगली २०.६, सातारा १८.८, सोलापूर २१.१, उस्मानाबाद १६.०, अमरावती १७.०, वाशीम १५.०, चंद्रपूर १६.६, ब्रह्मपुरी १२.१, गोदिया १२.५, वर्धा १७.६, यवतमाळ १९.०.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com