विदर्भात कृषी प्रक्रिया क्‍लस्टर उभारणार ः मंत्री सुभाष देसाई

मंत्री सुभाष देसाई
मंत्री सुभाष देसाई

नागपूर  ः  तालुका स्तरावर कृषी प्रक्रिया क्‍लस्टर उभारणे, कापूस ते कापड संकल्पना प्रत्यक्षात आणणे, लघू, मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे, विदर्भातील निर्माणाधीन १२३ प्रकल्पांचे काम २०२३ पर्यंत पूर्ण करणे, गोसेखुर्द प्रकल्पाचे काम २०२२ पर्यंत करणे अशी कामे विदर्भात शेतीविकासाला गती देण्याकरिता करण्याचे महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर असल्याची माहिती कृषिमंत्री सुभाष देसाई यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या वेळी शनिवारी (ता. २१) दिली. 

या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की ज्याप्रमाणे एसटीपीचे प्रकल्प राबवून मुंबईत पाणी शुद्धीकरण केले जाते, त्याच धर्तीवर खारपाणपट्ट्यात उपाययोजना केल्या जातील. या प्रकल्पाची अंमलबजावणी होईस्तोवर तलावांची चाचपणी करून त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विदर्भासह राज्यात रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. आदिवासी पाड्यापर्यंत पोचणे तर त्यातही आणखीच कठीण होते. या आदिवासी पाड्यापर्यंत रस्ते आणि प्राथमिक सुविधांची उपलब्धता करून दिली जाणार आहे.

नागपूर येथील निर्माणाधीन कर्करोग रुग्णालय लवकर पूर्ण व्हावे याकरिता निधी देण्यात येईल. मिहान प्रकल्प मार्गी लागावा याकरिता येथे येणाऱ्या उद्योगांना सवलतीच्या दरात वीज देण्यात येईल. ५० लाख कुटुंबांपर्यंत पाणी घरपोच दिले. ८१ लाख अद्यापही वंचित आहेत. ३१ मार्च २०२४ पर्यंत या कुटूंबांपर्यंत पाणी नळाद्वारे देण्यात येईल. कर्जमुक्‍त शेतकऱ्यांची यादी गावपातळीवर लावली जाईल, त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शी होईल. धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यापोटी ५०० रुपयांचा बोनस जाहीर केला. हमीभाव आणि बोनस याप्रमाणे ही रक्कम सुमारे २३५० रुपये होते. ही रक्‍कम २५०० रुपये केली जाईल, असेही श्री. ठाकरे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com