हापूस यंदा एकाच वेळी बाजारपेठेत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : यंदा प्रतिकूल हवामानस्थितीमुळे साधारणतः: जानेवारीमध्यापासून सुरू होणारा हापूस आंबा काढणी हंगाम यंदा एप्रिलमध्ये होणार आहे. उशिराच्या आगमनामुळे हापूस आंब्याचे बाजारपेठीय आणि निर्यातीचे गणित बदलणार असून, ऐन एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये आवक होण्याचे संकेत आहेत. मात्र, यामुळे निर्यात वाढीचीही शक्यता असल्याने काही अंशी बागायतदारांना दिलासा मिळणार आहे.  

यंदा मॉन्सूनचा दीर्घ मुक्काम, ऐन मोहोर लागण्याच्या अवस्थेत झालेला अवकाळी पाऊस, लांबलेली थंडी आदी विविध कारणांनी आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  बहर व्यवस्थापन लांबले परिणामी दरवर्षी जानेवारीच्या मध्यावधीमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये सुरू होणारा हापूस आंब्याचा हंगाम दोन महिने उशिराने सुरू होणार आहे. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेबरोबर निर्यातीवर देखील परिणाम होण्याची भीती आंबा बागायतदारांना आहे. तर यंदा निर्यातीचा कालावधीदेखील तीन महिन्यांवरून एक ते दीड महिनाच होणार असला तरी निर्यात वाढण्याचे संकेत आहेत.  

यंदाच्या आंबा हंगामाबाबत बोलताना कोकण हापूस आंबा उत्पादक व विक्रेते सहकारी संस्थेचे अध्यक्ष विवेक भिडे म्हणाले, ‘‘यंदाच्या हवामानाच्या सातत्याच्या बदलांमुळे आंबा हंगाम संकटात आला आहे. मॉन्सूनचा दीर्घ मुक्काम, मोहोर लागण्याच्या अवस्थेत ऑक्टोबरमध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि लांबलेली थंडी यामुळे अद्याप फळधारणा झालेली नाही. ऑक्टोबरमध्ये लागलेला मोहोर अवकाळी पावसाने गळल्याने, आता पुन्हा झाडांना पालवी फुटलेली आहे. यामुळे नवीन मोहोर लागण्याची वाट आम्ही पाहत आहोत. तर सातत्याने ढगाळ वातावरणामुळे देखील थंडी गायब आहे. याचा परिणामदेखील मोहोरावर झाला आहे. परिणामी, यंदाचा हंगाम दोन महिने लांबणीवर पडला आहे.’’ 

दरवर्षी साधारण जानेवारीच्या मध्यावर किंवा फेब्रुवारीमध्ये हंगाम सुरू होतो. मात्र, अद्याप मोहोरच लागलेला नसल्याने हा हंगाम एप्रिलमध्ये सुरू होईल. दरवर्षी देवगड, राजापूर, रत्नागिरी, दापोली असा हंगाम टप्प्याटप्प्याने सुरू होतो. मात्र, यंदा सर्वच भागांतील हंगाम एकदम सुरू होणार आहे. यामुळे एकाच वेळी मोठ्याप्रमाणावर आंबा बाजारात दाखल होणार असून, मागणीपेक्षा पुरवठा जास्त होण्याची शक्यता आहे, असे भिडे यांनी सांगितले. 

निर्यातवाढीची शक्यता : पवार पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार म्हणाले, ‘‘यंदा आंबा हंगाम उशिराने सुरू होणार असल्याने निर्यातीचा कालावधी कमी होणार आहे. दरवर्षी साधारण मार्च-एप्रिल आणि मे या कालावधी मध्ये निर्यात सुरू असते. मात्र, यंदा हा कालावधी दीड महिन्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. परंतु, असे असले तरी आंबा एकाच वेळी बाजारपेठेत जास्त उपलब्ध होणार असून, निर्यात वाढीची शक्यता आहे. निर्यातीसाठी पणन मंडळाची रत्नागिरी, नवीमुंबई येथील निर्यात सुविधा केंद्रे सुसज्ज करण्यात आली आहे. यंदा जास्तीत जास्त आंबा निर्यातीसाठीचे आमचे प्रयत्न आहेत.’’

मॅगोनेटअंतर्गत ७ हजार ८९८ बागांची नोंद  आंबा निर्यातीमधून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त परकीय चलन उपलब्ध व्हावे यासाठी निर्यातक्षम आंबा बागा करण्यासाठी कृषी आणि पणन विभागाने प्रशिक्षण शिबिर, शेतीशाळांच्या आयोजनातून मॅगोनेटअंतर्गत ७ हजार ८९८ बागांची नोंद करण्यात आली  आहे.

भौगोलिक निर्देशांतर्गत ३६८ बागांची नोंदणी जगात एकाच चवीचा आंबा उपलब्ध व्हावा, या आंब्यामध्ये इतर आंब्याची भेसळ होऊ नये यासाठी आंबा निर्यातीमध्ये कोकण हापूसची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी कोकण हापूसला भौगोलिक निर्देशांक मिळाला आहे. या अंतर्गत ३६८ आंबा उत्पादकांची नोंदणी आणि ६९ निर्यातदारांची नोंदणी करण्यात आली आहे.  

गेल्या हंगामात महाराष्ट्रातून २९३ कोटींची निर्यात गेल्या हंगामात (२०१९) वाशी येथील विकिरण निर्यात सुविधा केंद्रातून अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथे सुमारे ६०० टन, व्हेपर हिट ट्रिटमेंटद्वारे  युरोप, जपान, न्यूझीलँड, रशिया मॉरेशिअस येथे १५० टन, रत्नागिरी येथून ३२ टन तर बारामती येथील निर्यात सुविधा केंद्रातून ५५७ टन आंबा निर्यात करण्यात आला आहे. याद्वारे सुमारे २९३ कोटीचें परकीय चलन शेतकऱ्यांना मिळाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com