‘माळेगाव’च्या कार्यक्षेत्रात खांडज-शिरवली गट कार्यान्वित करण्यास मंजुरी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

माळेगाव, जि. पुणे  ः माळेगाव कारखान्याच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व गटांना समान प्रतिनिधित्व देण्यासाठी खांडज-शिरवली गट कार्यान्वित करण्यास शुक्रवारी (ता.२०) विशेष सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. प्रस्ताव शनिवारी (ता. २१) साखर आयुक्त कार्यालयाकडे शासकीय मान्यतेसाठी दाखल करण्यात आला. याची अंमलबजावणी आगामी निवडणुकीतच होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन अध्यक्ष रंजन तावरे यांनी दिले.

माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात माळेगाव, पणदरे, सांगवी, नीरावागज आणि बारामती हे पाच गट होते. तावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत खांडज-शिरवली हा सहावा गट पूर्वीप्रमाणे कार्यान्वित होण्यास मान्यता मिळाली. यामुळे सामाजिक आणि राजकीय समतोल ठेवण्यास मदत होणार असून, कारखान्याच्या सेवासुविधा संबंधित सभासदांना देण्यासंबंधीही सोयीचे होणार आहे.

‘माळेगाव’चा प्रस्तावित पोटनियम दुरुस्ती मसुदा अध्यक्ष तावरे यांनी मंजुरीसाठी मांडला. माळेगाव गटात माळेगाव खुर्द, येळेवस्ती, पाहुणेवाडी, ढाकाळे आदी गावांचा (सभासद संख्या २२५७), पणदरे गटात मानाप्पावाडी, पवईमाळ, सोनकसवाडी, कुरणेवाडी, धुमाळवाडी, खामगळवाडीचा (सभासद संख्या २६०३), सांगवी गटात कांबळेश्वर, शिरष्णे, पांढरेवाडी, पिंगळेवाडी (१८०१ सभासद), नीरावागज गटात घाडगेवाडी, मेखळी, सोनगाव (२७४३ सभासद), बारामती गटात कऱ्हावागज नव्याने घेतले असून मळद, मेडद, गुणवडी, डोर्लेवाडी, नेपतवळण आदी गावे (२५२६ सभासद) प्रस्तावित केली आहे. नव्याने अस्तिवात आलेल्या खांडज- शिरवली गटात १८४२ सभासद संख्या प्रस्तावित केली. 

९७ व्या घटनादुरुस्तीनुसार २१ प्रतिनिधींचे संचालक मंडळ यापुढेही असेल. पहिल्या मतदार संघात १५ प्रतिनिधी असतील. प्रत्येक गटात दोन असे १२ व उर्वरित ३ प्रतिनिधींना गट क्रमवारीनुसार घेता येईल. नियमानुसार महिलांसह सहा जणांना आरक्षणानुसार प्रतिनिधित्व मिळेल, असे तावरे यांनी स्पष्ट केले. सभासद जयसिंग आटोळे यांनी या विषयाला सर्वानुमते अनुमोदन दिले. या वेळी ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, उपाध्यक्ष चिंतामणी नवले, संचालक बाळासाहेब तावरे, प्रमोद गावडे, पोपटराव तुपे, मदनराव देवकाते, योगेश जगताप, सतीश तावरे, अविनाश गोफणे, राजेंद्र ढवाण, ॲड. रवींद्र माने, नितीन आटोळे, ॲड. राहुल तावरे  उपस्थित होते. 

दरम्यान, ‘माळेगाव’ची आगामी निवडणुकीची तयारी सुरू असून मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आचारसंहिता व राज्यातील बदललेले सरकार विचारात घेता ‘माळेगाव’च्या प्रस्तावित पोटनियम दुरुस्ती मसुद्याला कितपत मान्यता मिळते, याबाबतची शंका जयसिंग आटोळेंसह अनेकांनी उपस्थित केली.

कार्यकारी संचालक वाबळे यांचे अभिनंदन ‘माळेगाव’चे कार्यकारी संचालक विजय वाबळे यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) नुकताच उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार जाहीर केला. त्याबद्दल अध्यक्ष रंजन तावरे यांनी मांडलेल्या अभिनंदनाच्या ठरावाला उपस्थितांनी टाळ्या वाजवून पाठिंबा दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com