माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब तावरे

माळेगाव कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब तावरे , उपाध्यक्ष तानाजी कोकरे
माळेगाव कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब तावरे , उपाध्यक्ष तानाजी कोकरे

माळेगाव, जि. पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब पाटील तावरे यांची रविवारी बिनविरोध निवड झाली; तसेच उपाध्यक्षपदी तानाजी तात्यासाहेब कोकरे यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. 

नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. तावरे व उपाध्यक्ष श्री. कोकरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. श्री. पवार यांनी या दोन्ही अनुभवी चेहऱ्यांना संधी देत आपले ‘माळेगाव’वर पुन्हा वर्चस्व प्रस्तापित केले. विशेषतः बाळासाहेब तावरे यांनी अध्यक्षपदावर टप्पापद्धतीने सुमारे १४ वर्षे असे सर्वाधिक काळ काम केल्याची नोंद आहे. 

माळेगाव कारखान्याची २५ फेब्रुवारीला पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नीलकंठेश्वर पॅनेलचा विजय झाला होता. २१ पैकी १७ जागा जिंकत पवार यांनी ‘माळेगाव’ची सत्ता खेचून आणली. मावळते अध्यक्ष व पवार यांचे विरोधक रंजन तावरे, संचालक चंद्रराव तावरे यांना या निवडणुकीत स्वतःसह चार जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे कारखाना विस्तारीकरणातील राहिलेल्या काही त्रुटी, ‘राष्ट्रवादी’चे एकनिष्ठ केलेले काम आदी बाबी विचारात घेत अजित पवार यांनी ‘राष्ट्रवादी’चे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्यातर्फे बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे यांची नावे सूचविली. त्यानुसार रविवारी निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज हिरे यांच्याकडे अध्यक्षपदासाठी बाळासाहेब तावरे; तर उपाध्यक्षपदासाठी तानाजी कोकरे यांचे एकमेव अर्ज दाखल झाले. 

दरम्यान, बाळासाहेब तावरे म्हणाले, की काटकसरीबरोबरच विस्तारीकरणातील त्रुटी भरून काढत दर्जेदार साखर उत्पादन करणे, रिकव्हरी लॉस कमी करून उपपदार्थ निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविणे यापुढे आव्हानात्मक आहे. हे सगळे पूर्णत्वाला आणून सभासदांना विक्रमी दर देण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह संचालक मंडळाचे सहकार्य नक्की लाभेल.

तत्पूर्वी रंजन तावरे यांनीही पाच वर्षांत सभासदांना सर्वाधिक ऊस दर देत कारखान्याचे महत्त्वाकांक्षी विस्तारीकरण यशस्वी केल्याचे सांगितले. या वेळी रमेश गोफणे, विश्वास देवकाते, योगेश जगताप, प्रकाश देवकाते, केशवराव जगताप, राजेंद्र ढवाण, सुरेश खलाटे आदींनी नवीन व जुन्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com