जळगावातून उत्तर भारताकरिता केळीची वाहतूक सुरू

मागील दोन दिवसांत केळीची काढणी झाली आहे. सावदा येथील व्यापाऱ्यांनी ती खरेदी केली. केळीला ४०० ते ५०० रुपये क्विंटल असे दर मिळत आहेत. दर कमी झाले असले तरी काढणी सुरू झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. - विकास महाजन, शेतकरी, ऐनपूर, जि.जळगाव.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह राजस्थान, नागपुरात वाहतूक सुरू झाली आहे. शुक्रवारी (ता.२७) सुमारे ११० टन केळी या भागात पाठवण्यात आली. वाहतूक रखडत सुरू असल्याने केळी काढणीला वेग आलेला नाही. मागणी व पुरवठा यासंदर्भातील गणित विस्कळीत असल्याने केळीची उधारीवर विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तसेच केळीला दर निम्मे म्हणजेच ४०० ते ५०० रुपये क्विंटल असे मिळत आहेत. केळी पाठवण्यासाठी सात ते आठ टन व १५ टन क्षमतेच्या वाहनांचा वापर करण्यात आला आहे. 

सावदा (ता.रावेर) व फैजपूर (ता.यावल) येथील खरेदीदारांनी केळी खरेदी करून ती उत्तरेकडील राज्यांना पाठवली आहेत. रावेर, यावल, मुक्ताईनगर व जामनेर या भागांतील केळी काढणीसाठी तयार आहे. परंतु उचल वाढल्यानंतरच काढणीला वेग येईल व दरातही सुधारणा होईल. मागील वर्षी मार्चच्या अखेरीस केळीस १००० रुपये क्विंटल असे दर होते तर आखातातील निर्यातही वेगात सुरू होती. निर्यातक्षम केळीला १२०० रुपये क्विंटल दर मिळत होता. निर्यातीसाठी पाच कंपन्यांनी चोपडा, रावेर,  मुक्ताईनगर, यावल भागात काम सुरू केले होते. यंदा आखातातील निर्यात बंद आहे. 

परंतु, उत्तरेकडील केळीची वाहतूक मागील दोन दिवसांत सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण काढणी वेळेत झाली नसती तर मोठे नुकसान सहन करावे लागले असते. गुरुवारी (ता.२६) २० ट्रक म्हणजेच ३० मेट्रिक टन केळी उत्तर भागासह राजस्थानात पाठवण्यात आली. ही वाहतूक पूर्वपदावर येईल, असा विश्‍वास शेतकरी व्यक्त करीत असून, यासंदर्भातील प्रश्‍न सोडविण्यासाठी केळी उत्पादक महासंघ केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com