मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी समन्वयातून कार्यक्रम राबवावा : माजी मंत्री पंकजा मुंडे

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाचे मूळ समजून घेऊन त्या अनुषंगाने कृतिशील पावले उचलण्याची गरज आहे. - पंकजा मुंडे, माजी मंत्री
माजी मंत्री पंकजा मुंडे
माजी मंत्री पंकजा मुंडे

औरंगाबाद : कायम दुष्काळ व पाणीतुटीचा सामना करणाऱ्या मराठवाड्याचा पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयातून कार्यक्रम हाती घ्यावा, असा सल्ला माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला.

‘कोरोना’ च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची पहिली पाणी परिषद शनिवारी (ता. ३०) फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून पार पडली. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. ही पाणी परिषद दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी एकात्मिक जलनिती या मुख्य संकल्पनेवर आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या,की पावसाचे पडणारे पाणी अडवावे लागेल. शिवाय मराठवाड्याला हक्काचे पाणी ही मिळायलाच हवे. पाणीच नसेल तर सर्वच क्षेत्रांवर परिणाम होईल. मराठवाड्यातील ३१७ टीएमसी पाण्याची तूट भरून काढण्यासाठी अपूर्ण असलेल्या धरणांची कामे पूर्ण करावी लागतील. याशिवाय अधिक पाणी असलेल्या खोऱ्यातील पाणी मराठवाड्यातील तुटीच्या खोऱ्यात नेण्यासाठी प्रकल्प हाती घ्यावे लागतील. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणल्यास बऱ्यापैकी पाणी प्रश्न सुटू शकतो. आमच्या सरकारच्या काळात ‘जलयुक्त’च्या माध्यमातून एक लोकचळवळ उभी राहिली. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही संकल्पना राबवली गेली. काही नेत्यांनी मराठवाड्याच्या विकासाची भूक लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात कामे करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये स्व. शंकरराव चव्हाण, स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. विलासराव देशमुख आदींची नावे प्राधान्याने घ्यावी लागतील. कायम दुष्काळ व आवश्यकतेच्या तुलनेत कायम पाणी तुटीचा सामना करणाऱ्या मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी केंद्र व राज्याने समन्वयाने कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. त्यासाठी पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे योगदान घेता येईल. मराठवाड्यात सामान्यतः उशिराने पावसाचे आगमन होते असे दिसते. त्यामुळे मराठवाड्यात जलसंधारणाच्या कामांच्या अनुषंगाने रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. मराठवाडा पाणी परिषदेच्या माध्यमातून आलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने आपण स्वतः मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविक मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी केले. मराठवाड्यात पाण्याअभावी आरोग्य, शिक्षण, रोजगाराबाबत प्रश्न निर्माण झाले. या विविध प्रश्नांच्या दुष्टचक्रामुळे शेतकरी आत्महत्या सारख्या समस्येने उग्र स्वरूप धारण केले असून पाण्याअभावी मराठवाड्याचे वाळवंटीकरण होत आहे. या प्रश्नांवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी मराठवाडा पाणी परिषदेची स्थापना करण्यात आल्याचे श्री. शिवपुरे यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com