अॅग्रोवन कृषी प्रदर्शन :शेतकरी गट, बचत गटांच्या शेतमाल विक्रीला प्रतिसाद

शेतकरी गट, बचत गटांच्या उत्पादनांना ग्राहकांची मिळाली पसंती
शेतकरी गट, बचत गटांच्या उत्पादनांना ग्राहकांची मिळाली पसंती

औरंगाबाद ः सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली विविध प्रकारची धान्ये, डाळी, हळद, गुळाची काकवी, गुळपट्टी आणि लाकडी घाण्यावरील तेल यासह विविध पदार्थांना अॅग्रोवन कृषी प्रदर्शनात शुक्रवारी (ता. २७) पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. विशेषतः शहरी ग्राहकांकडून या उत्पादनांना सर्वाधिक पसंती मिळत होती. 

अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी मराठवाड्यासह अन्य भागातील शेतकऱ्यांनी आवर्जून हजेरी लावली. आत्मा प्रकल्पांतर्गत तयार झालेले शेतकरी गट प्रामुख्याने प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते. प्रदर्शनात जवळपास २० हून अधिक शेतकरी गट आणि महिला बचत गटांनी सहभाग घेतला आहे. प्रदर्शनस्थळी स्वतंत्र विभाग त्यासाठी तयार करण्यात आला आहे. प्रदर्शनामधील ते खास आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

प्रदर्शनाच्या उद्‍घाटनाची वेळ दुपारी चारची होती, पण त्या आधीच प्रदर्शनस्थळावर शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. पारंपरिक पद्धतीने बनवलेले कच्ची घाणा करडी तेल, गुळाची काकवी, गुळाची पावडर, गूळ, यासह तूरडाळ, मटकी डाळ, हरभरा डाळ, उडीदडाळीसह ज्वारी, गहू आदी धान्ये आणि लाल मिरचीची खरेदी-विक्री येथे होत होती. विशेषतः यापैकी बहुतांश धान्य आणि उत्पादने ही सेंद्रिय पद्धतीची असल्याने ग्राहकांची या स्टॅालवर सर्वाधिक गर्दी होती. गावरान खा, निरोगा राहा, सेंद्रिय पद्धतीची उत्पादने असे फलक या विभागात सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पदार्थात काय घटक आहेत याची माहिती ग्राहक थांबून घेत होते. 

कांद्याची रिंग, नागलीचे पोंगे महिला बचत गटाने तयार केलेल्या उत्पादनामध्ये हळद, लोणचे, उडीद पापड, नागली पापड, कच्ची पाणीपुरी यासारखे पारंपरिक पदार्थ आहेतच. पण त्याशिवाय कांद्याची रिंग आणि नागलीचे पोंगे यासारखे वेगळे उपपदार्थही या ठिकाणी पाहावयास व चाखावयास मिळत होते. या पदार्थांकडे ग्राहक आकर्षित होत होते.  

लाकडी घाण्यावरील तेल लाकडी घाण्यावरील तेलाचे विविध प्रकार या ठिकाणी आहेत. त्यात करडी तेल, शेंगदाणा तेल, खोबरे तेल, तीळ तेल, जवस तेल, मोहरी तेल यासारखे विविध तेलाचे प्रकार उपलब्ध आहेत. शहरी ग्राहक तेलाची आवर्जून खरेदी करत आहेत.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com