परळी वैजनाथ झोनमधील कापूस खरेदी तात्पुरती बंद

सीसीआयकडून खरेदीपोटी मिळणारे २ टक्‍के कमिशन बंद झाले असले तरी पणन महासंघाने आपली खरेदी सुरूच ठेवली आहे. सद्यःस्थितीत विदर्भात सात लाख १० हजार क्‍विंटल कापसाची खरेदी झाली आहे. मराठवाड्यात आवक वाढती असली तरी तेथे गोदामाचा प्रश्‍न निर्माण झाल्याने खरेदीवर परिणाम झाला आहे. - अनंतराव देशमुख,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ
  संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर  ः मराठवाड्यात कापसाची सर्वाधिक आवक असून, साठवणुकीचा प्रश्‍न निर्माण झाल्याने महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाकडून ‘सीसीआय’साठी करण्यात येणाऱ्या खरेदीला फटका बसला आहे. परळी वैजनाथ झोनमधील २३ केंद्रांवर ही समस्या निर्माण झाली असून, येथील कापूस खरेदी तात्पुरती बंद करण्यात आल्याचे पणन महासंघाच्या सूत्रांनी सांगितले.

सीसीआयकरिता एजंट म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून राज्यात कापूस खरेदी केली जात आहे. या वर्षी केंद्र सरकारने कापसाला ५५५० रुपये क्‍विंटल दर जाहीर केला आहे. पणन आणि सीसीआयने बाजारात हस्तक्षेप केल्यानंतर कापसाचे खुल्या बाजारातील दरही तेजीत आले होते. ४९०० ते ५३०० रुपये क्‍विंटलपर्यंत हे दर पोचले होते. आता पणन महासंघाच्या खरेदीत तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे पाहून खुल्या बाजारात व्यापारी ४८०० ते ५१०० रुपये क्‍विंटल दराने कापसाची खरेदी करीत असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने विदर्भात सात लाख दहा हजार क्‍विंटल, तर उर्वरित महाराष्ट्रात १८ लाख २५ हजार क्‍विंटल याप्रमाणे कापूस खरेदी केला आहे. 

मराठवाड्यातील परळी वैजनाथ झोनमध्ये कापसाची सर्वाधिक आवक असताना याच झोनमधील कापूस खरेदी साठवणुकीच्या कारणावरून बंद करण्यात आली आहे. सीसीआयच्या निकषानुसार खरेदी केलेल्या कापसाची साठवणूक केंद्र व राज्य सरकारची गोदामे, तसेच बुलडाणा अर्बनच्या गोदामात केली जाते. मराठवाड्यात या तीनही यंत्रणांची गोदामे मर्यादित असल्याने कापूस साठवणुकीसाठी अडचण उद्‍भवल्याचे सांगण्यात आले. विदर्भातील बहुतांश केंद्रांवर मात्र खरेदी सुरळीत सुरू आहे.

राज्यात १४०० कोटींची खरेदी  पणन महासंघाने राज्यात १४०० कोटी रुपयांचा कापूस खरेदी केला आहे. यातील एक हजार कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले असून, उर्वरित ४०० कोटी रुपयांचे चुकारे करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com