खानदेशात कापूस दर ५१०० रुपये क्विंटलपर्यंत

खानदेशात कापूस दर ५१०० रुपये क्विंटलपर्यंत
खानदेशात कापूस दर ५१०० रुपये क्विंटलपर्यंत

जळगाव  ः शासकीय खरेदी बऱ्यापैकी सुरू असल्याने खानदेश, पश्‍चिम विदर्भ व मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना भागांत कापसाचे दर टिकून आहेत. खेडा खरेदी संथ सुरू असून, दर ५००० ते ५१०० रुपये क्विंटलपर्यंत स्थिर आहेत. कापसाखालील क्षेत्र रिकामे केले जात असल्याने पुढे कापसाचा तुटवडा वाढणार आहे. यामुळे सध्या अनेक जिनिंग प्रेसिंग कारखानदार, खरेदीदार कापसाची खरेदी करून घेत आहेत. 

कापसाची बाजारातील आवक खेडा खरेदी संथ असल्याने मागील आठ ते दहा दिवसांत कमी झाली आहे. खानदेशात मिळून मागील आठवड्यात सुमारे २५ हजार क्विंटल कापसाची खेडा खरेदी झाल्याचा अंदाज आहे. खेडा खरेदीत दर्जेदार कापसाला ५००० ते ५१०० रुपये क्विंटल दर मिळाले. गुजरातमधील खरेदीदारांचे एजंट सध्या कापसाच्या खेडा खरेदीबाबत फारसे सक्रिय नसले तरी खानदेशातील नंदुरबारमधील शहादा, धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल भागात मध्य प्रदेश व गुजरातमधील कारखानदार खरेदी करून घेत आहेत. मागील १० ते १२ दिवसांपासून वातावरण ढगाळ असल्यानेदेखील गुजरात, मध्य प्रदेशातील खरेदीदार कापसाची खरेदी करताना सावध भूमिका घेत आहेत. 

खानदेशात सुमारे १२५ जिनिंग प्रेसिंग कारखाने सुरू आहेत. काही कारखान्यांमधील प्रक्रिया निम्म्या क्षमतेने सुरू आहे. यामुळे जिनिंग प्रेसिंग कारखान्यांमधील कापूस खरेदीवरही परिणाम जाणवत आहे. किरकोळ व्यापारी गावोगावी खरेदी करीत आहेत. शासकीय खरेदी सुरू असल्याने अनेक शेतकरी महामंडळ व पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रांमध्ये कापसाची विक्री करीत आहेत. या केंद्रात कापसाला किमान ५१०० रुपये क्विंटल दर मिळत आहे.  

खानदेश, पश्‍चिम विदर्भात गेल्या आठवड्यापर्यंत मिळून सुमारे १० लाख कापूस गाठींचे उत्पादन झाले. हे उत्पादन मागील वर्षाएवढेच आहे. बाजार अस्थिर असल्याने खरेदीदार गाठींचे साठे कमी करीत आहेत.  खानदेशात पूर्वहंगामी कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी क्षेत्र रिकामे करीत आहेत. खानदेशात सुमारे दीड लाख हेक्‍टरवर पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली होती. यातील कमाल क्षेत्र रिकामे झाले असून, यातून पुढे कापसाचे उत्पादन होणार नाही.

सरकीचे दर स्थिर खानदेशात सरकीचे दर स्थिर म्हणजेच २३०० ते २४०० रुपये क्विंटल राहिले. सरकीचे सौदेही बऱ्यापैकी झाले. शासकीय केंद्रांतही सरकीचे ऑनलाइन सौदे झाले. सरकीची लागलीच विक्री करण्यावर कारखानदार, शासकीय केंद्रांनी भर दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com