`सरकारच्या निर्णयाचे स्वागत; मात्र कांदा निर्यात कार्यवाहीसाठी उशीर का?` 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक  : कांदा निर्यात प्रक्रिया १५ मार्चपासून सुरळीत होण्याबाबतची अधिसूचना केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, कांदा उत्पादक व शेतकरी संघटनांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. या निर्णयामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरवेळी कांदा उत्पादकांचे नुकसान झाल्यानंतर निर्णय होतो. सरळ मार्गाने प्रश्न का सुटत नाहीत. निर्णयाचे स्वागत मात्र आता निर्यातीबाबत तत्काळ कार्यवाही व्हावी, असा मागणीवजा सूर शेतकरी, व्यापाऱ्यांमधून उमटत आहे.

केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी २६ फेब्रुवारीला ट्विट करून कांदा निर्यातबंदी उठविण्याबाबत संकेत दिले होते. मात्र पुढील सहा दिवस काहीही घोषणा होत नसल्याने कांदा दरात चढउतार पाहायला मिळाले. या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २) जिल्हाभर कांदा लिलाव बंद पाडून आंदोलनाच्या माध्यमातून रोष व्यक्त केला. खासदार डॉ. भारती पवार यांनी ही बाब वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या लक्षात आणून दिली. कांदा उत्पादकांच्या आंदोलनाची धग लक्षात घेत केंद्र सरकारच्या माध्यमातून १५ मार्चपासून कांदा निर्यात खुली करण्याबाबतचे ट्विट श्री. गोयल यांनी केले.

या घोषणेनंतर विदेश व्यापार महासंचालनालयाने संचालक अमित यादव यांच्या स्वाक्षरीने कांदा निर्यात धोरणात बदल करून निर्यात खुली केल्याबाबत अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली. यासाठी गेल्या चार महिन्यांपासून पाठपुरावा केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासाठी आंदोलने केली, निवेदने दिली. आता निर्णय घेण्यात अगोदरच वेळकाढूपणा झाला असताना प्रत्यक्ष निर्यातीसाठी अजून १५ दिवस वाट पहायची का? असा सवाल उपस्थित होत आहे. 

प्रतिक्रिया

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयाचे स्वागत. मात्र तातडीने घोषणा झाली असती तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊन दर घसरण्याला आळा बसला असता.  - मनोज जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव, जि. नाशिक.

अधिसूचना जाहीर झाल्यानंतर निर्यातमूल्य माफ करण्यात आले आहे. त्यामुळे अप्रत्यक्ष कांदा निर्यात प्रक्रियेत प्रोत्साहन दिल्यासारखे आहे. मात्र उष्णता वाढत असल्याने कांदा टिकणार नाही. सरकारने या निर्णयासाठी अगोदरच उशीर केल्याने लगेच निर्यात प्रक्रिया सुरू करून तत्काळ कांदा उत्पादक व व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा. - कुबेर जाधव, संपर्कप्रमुख, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com