शेतकरी कंपन्यांना `ई-नाम’शी जोडणार

 संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतीमाल बाजार संघटित करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर ‘ई-नाम’ प्रणाली सुरू केली आहे. आता देशातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही ‘ई-नाम’शी जोडण्यात येणार आहे. यादृष्टीने सरकार काम करीत आहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.

सध्या देशात ३ हजार ५०० शेतकरी उत्पादक कंपन्या विविध राज्यांमध्ये कार्यरत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘१२ राज्यांतील जवळपास एक हजार शेतकरी उत्पादक कंपन्या ‘ई-नाम’शी जोडल्या आहेत. लवकरच आणखी कंपन्या जोडण्यात येतील. या प्रणालीतून शेतकऱ्यांना बाजार समित्यांत न जाता आपला माल विकता येणार आहे. तेसच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला माल जागेवरून विकता येईल. शेतकरी उत्पादक कंपन्या या बाजारात स्वायत्त बाजाराप्रमाणे काम करतील. याधीच गोदामांचा समावेश ‘ई-नाम’मध्ये करण्यात आला आहे.’’  

‘‘सरकारने ‘ई-नाम’वर गोदामांचा समावेश केला आहे. या गोदामांकडून शेतकऱ्यांना व्यापारासाठी आवश्‍यक पावत्या मिळतील, तसेच मालाची गुणवत्ता आणि किती माल आहे याचे प्रमाणपत्रही मिळेल. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्‍चिम बंगालमधील काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी यापूर्वीच ‘ई-नाम’वर नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या या शेतकरी कंपन्या आता ‘ई-नाम’वर व्यापार करण्यासाठी पात्र ठरल्या आहेत,’’ असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.  ‘‘राज्यांकडून मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात एक हजार बाजार समित्यांना ‘ई-नाम’शी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे,’’ असेही त्यांनी सांगितले. 

 केंद्र सरकारने २०१८-१९ मध्ये ५८५ बाजारांचा ‘ई-नाम’मध्ये समावेश केला आहे, तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ३८० बाजारांचा समावेश करण्यात आला आहे. मार्च २०२० पर्यंत इतर बाजार जोडण्यात येतील. बऱ्याच राज्यांना बाजारांचा समावेश ‘ई-नाम’मध्ये करण्यासाठी केंद्राकडे लेखी मागणी केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

‘ई-नाम’ दृष्टिक्षेपात

  • ९६५ बाजारांचा ‘ई-नाम’मध्ये समावेश. 
  • मार्च २०२० पर्यंत उरलेले बाजार जोडण्यात येतील.
  • सध्या देशात ३ हजार ५०० शेतकरी उत्पादक कंपन्या.
  • १२ राज्यांतील एक हजार कंपन्या ‘ई-नाम’शी संलग्न.
  • शेतकरी कंपन्यांमार्फत माल जागेवरून विकता येईल.
  • मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्‍चिम बंगालमधील काही शेतकरी कंपन्या ‘ई-नाम’ संलग्न.
  • नोंदणीकृत शेतकरी कंपन्या ‘ई-नाम’वर व्यापारासाठी पात्र.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com