नगर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर तूर खरेदीला प्रतिसाद मिळेना 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी आठ ठिकाणी केंद्रे सुरू झाली आहेत. मात्र त्यातील सहा खरेदी केंद्रांवर तूर खरेदीला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीत. आतापर्यंत ११ हजार ४४९ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली. ३४८४ शेतकऱ्यांना निरोप पाठविले गेले तरीही खरेदी केंद्रांवर दहा दिवसांत केवळ १३८० शेतकऱ्यांची ९ हजार २६८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. खरेदीबाबत सरकारने घातलेल्या जाचक अटींमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. एका एकरात दहा ते बारा क्विंटल तुरीचे उत्पादन होते. त्यामुळे एका शेतकऱ्याची एकरी दोन क्विंटल तूर खरेदी करण्याचा नियम शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. 

जिल्ह्यात वांबोरी, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, नगर, कर्जत, खर्डा (जामखेड), श्रीगोंदा या ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरु झाली असून मिरजगाव (कर्जत) व नेवासा येथे दोन दिवसांत तूर खरेदी सुरू होणार आहे. मात्र सुरू असलेल्या आठ केंद्रांपैकी सहा केंद्रांवर तूर खरेदीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.

खरेदी केंद्रे सुरू करण्याची परवनागी मिळालेल्या केंद्रांकडे आतापर्यंत ११ हजार ४४९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यातील ३ हजार ४८४ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर तूर विक्रीला आणण्याबाबत संदेश पाठवले आहेत. त्यातील १३८० शेतकऱ्यांनी ९ हजार २६८ क्विंटल तुरीची विक्री केली आहे. पाथर्डी, पारनेर, नगर, खर्डा, श्रीगोंदा, वांबोरी या खरेदी केंद्रांवर तूर खरेदीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.    तूर खरेदीतील अडचणी ‘नाफेड’चे हमी भावाने तूर खरेदी केंद्रांवर दहा दिवसांपूर्वी खरेदी सुरू करण्यात आली आहे. तूर खरेदी करण्यात दोन अडचणी आहेत. एक म्हणजे तुरीतील आर्द्रता १२ टक्के असावी. ती आर्द्रता सध्या सोळा ते चौदा टक्के आहे. तूर वाळवली तरच आर्द्रता कमी होते. दुसरी व महत्त्वाची अडचण अशी, की एका शेतकऱ्याची एकरी केवळ दोन क्विंटल तूर खरेदी करावी, असा नियम आहे. परंतु एका एकरात दहा ते बारा क्विंटल तुरीचे उत्पादन होते. मग दोन क्विंटल सरकारला विकायची आणि बाकीची तूर कुठे विकायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. सरकारने या अटी रद्द करून शेतकऱ्यांची आहे तेवढी तूर खरेदी करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.   केंद्रनिहाय तूर खरेदी क्विंटलमध्ये (कंसात शेतकरी) : वांबोरी ः २४२ (३८), शेवगाव ः ४३५३(६४०),  कर्जत ः ३९८० (५९२),  पाथर्डी ः २४६ (३९), पारनेर ः ८ (१), नगर ः २५५ (६),  खर्डा ः १६५ (२२), श्रीगोंदा ः १९ (२).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com