तीन जिल्ह्यांत हमीभावाने तूर खरेदीसाठी गोदाम व्यवस्था अपुरी

तीन जिल्ह्यांत हमीभावाने तूर खरेदीसाठी गोदाम व्यवस्था अपुरी
तीन जिल्ह्यांत हमीभावाने तूर खरेदीसाठी गोदाम व्यवस्था अपुरी

परभणी : राज्य वखार महामंडळांतर्गत लातूर विभागातील पाच जिल्ह्यांतील गोदामांमध्ये रुईच्या गाठी आणि अन्य मालाची साठवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या गोदामांमध्ये ६८ हजार ४८६ टन माल साठवणक्षमता शिल्लक आहे. गोदाम व्यवस्था अपुरी असल्यामुळे हमीभावाने तूर खरेदीसाठी विलंब लागत आहे. वखार महामंडळाकडून खासगी गोदाम भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोदाम व्यवस्था उपलब्ध झाल्यानंतरच तूर खरेदी सुरू होईल, असे संबंधित सूत्रांनी सांगितले.

राज्य वखार महामंडळाच्या लातूर विभागाअंतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. परभणी जिल्ह्यात महामंडाळाची ४२ आणि खासगी ३ अशी एकूण ४५ गोदामे असून त्यांची साठवण क्षमता ६९ हजार ९३० टन आहे. हिंगोली जिल्ह्यात वखार महामंडाळाची २२ आणि खासगी १ अशी २३ गोदामे असून त्यांची साठवण क्षमता ३३ हजार ७८० टन आहे. नांदेड जिल्ह्यात महामंडळाची ३१ आणि खासगी १ अशी एकूण ३३ गोदामे असून त्यांची साठवण क्षमता ४९ हजार ९८१ टन आहे. लातूर जिल्ह्यात महामंडळाची ३६ आणि खासगी २ अशी एकूण ३८ गोदामे असून त्यांची साठवण क्षमता ७१ हजार ४८० टन आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात महामंडळाची ९ आणि खासगी ४ अशी ११ गोदामे असून त्यांची साठवण क्षमता २१ हजार २४५ टन आहे. 

लातूर विभागात वखार महामंडळाची १४० गोदामे आणि भाडेतत्त्वावर घेतलेली खासगी १२ गोदामे मिळून एकूण १५२ गोदामे असून त्यांची एकूण साठवण क्षमता २ लाख ४८ हजार ९३६ टन आहे. सध्या या गोदामांमध्ये पणन महामंडळ, सीसीआय तसेच खासगी उद्योजकांनी खरेदी केलेल्या कापसाच्या १ लाख ७० हजार ६४० रुईच्या गाठी साठविण्यात आल्या आहेत. याशिवाय सोयाबीन, तूर, हरभरा, करडई, ज्वारी, गहू, तूर डाळ, मका, मूग, मूग डाळ, उडीद, तांदूळ या शेतमालासह सरकी, खते आदी मिळून एकूण १ लाख ८० हजार ४५० टन मालाची साठवणूक करण्यात आली आहे.

शुक्रवारपर्यंत (ता. ३१) काही ठिकाणच्या गोदामामध्ये मिळून एकूण ६८ हजार ४८६ टन एवढी साठवण क्षमता शिल्लक होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा आणि नांदेड जिल्ह्यातील वाई बाजार (ता. माहूर) येथे वखार महामंडळाच्या गोदामांची बांधकामे सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर साठवणुकीची व्यवस्था होईल.

रुईच्या गाठीची साठवणूक केली जात असल्यामुळे हमीभावाने खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा कमी पडत असल्याने खासगी गोदामे भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोदामांची व्यवस्था झाल्यानंतरच हमीभावाने तूर खरेदी सुरू होईल असे सूत्रांनी सांगितले.   अशी आहे स्थिती

  • लातूर विभागातील १५२ गोदामांमध्ये १ लाख ८० हजार ४५० टन मालाची साठवणूक.
  • उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांत गोदामांची बांधकामे सुरू.
  • रुईच्या गाठींची साठवणूक केल्यामुळे हमीभावाने खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा पडतेय कमी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com