मुंबई बाजार समितीत महाविकास आघाडीचीच सत्ता

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपला एकही जागा जिंकता आलेली नाही. ६ महसूल आणि ४ व्यापारी मतदारसंघात महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. या एकूण अठरा जागांपैकी तेरा जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत, तर पाच जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे. 

राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही होऊ लागला आहे. असाच प्रयोग मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीतही झाला. सोमवारी या निवडणुकीची मतमोजणी झाली. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना यांनी आपले पॅनेल बनवले होते. भाजपही या निवडणुकीत सहभागी होता. मुंबई बाजार समितीच्या ६ महसूल आणि ४ व्यापारी अशा एकूण १० मतदारसंघांची निवडणूक शनिवारी (ता. २९ फेब्रुवारी) पार पडली. निवडणुकीमध्ये सोळा जागांसाठी एकूण ५८ उमेदवार रिंगणात होते, तर दोन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. ६ महसूल विभागांत एकूण ३९२८ मतदारांपैकी ३८७८ मतदारांनी मतदान केले होते. एकूण सरासरी ९२.५७ टक्के मतदान झाले होते. 

मुंबई बाजार समितीच्या वाशी येथील कांदा-बटाटा बाजाराच्या आवारात मतमोजणी पार पडली. मुंबई बाजार समितीत राज्यातील सहा महसुली विभागांतून बारा शेतकरी प्रतिनिधी समितीच्या संचालक मंडळावर निवडून येतात. मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मुंबईमधून अर्थात तुर्भे येथील एपीएमसी बाजारातून सहा संचालक निवडून दिले जातात. यात कांदा बटाटा लसूण, भाजी, फळ, धान्य आणि मसाला बाजारातून प्रत्येकी एक संचालक तर या बाजारात गेली अनेक वर्षे काम करणारे माथाडी, हमाल, कामगारांमधून एक संचालक निवडला जातो. पाच संचालक हे राखीव संवर्गातून राज्य शासनाकडून नियुक्त केले जाणार असून दोन संचालक हे मुंबई व नवी मुंबई पालिकेमधून नियुक्त होणार आहेत.

महसूल विभागनिहाय विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते 

  • अमरावती विभाग  : प्रवीण देशमुख (महाविकास आघाडी) - ४८८, माधवराव जाधव (महाविकास आघाडी) - ४३७
  • कोकण विभाग  : प्रभाकर पाटील (अपक्ष) - १८२, राजेंद्र पाटील (महाविकास आघाडी) - १२४
  • पुणे विभाग  : बाळासाहेब सोळस्कर ( महाविकास आघाडी) - ४६३, धनंजय वाडकर ( महाविकास आघाडी) - ३९०
  • नागपूर विभाग  : हुकूमचंद आमधरे (महाविकास आघाडी) - ४९२, सुधीर कोठारी ( महाविकास आघाडी) - ३८७
  • नाशिक विभाग : जयदत्त होळकर ( महाविकास आघाडी ) - ४०२, अद्वैत हिरे (अपक्ष) - ५१८
  • औरंगाबाद  : वैजनाथ शिंदे ( महाविकास आघाडी) - ४५९, अशोक डक (महाविकास आघाडी ) - ६२५
  • व्यापारी विभाग  

  • कांदा बटाटा मार्केट : अशोक वाळुंज (महाविकास आघाडी) ४३१ 
  • भाजीपाला मार्केट : शंकर पिंगळे (अपक्ष)  ९९६ 
  • दाणा मार्केट : नीलेश वीरा (अपक्ष) ४१२ 
  • मसाला मार्केट : विजय भुता (अपक्ष ) ३१६ 
  • माथाडी मतदारसंघ : शशिकांत शिंदे बिनविरोध ( महाविकास आघाडी) 
  • फळ मार्केट : संजय पानसरे – बिनविरोध ( महाविकास आघाडी )
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com