पुणे बाजारसमितीत शेतीमाल विक्री व्यवस्थेत सुधारणेसाठी नियमावली ः बी.जी.देशमुख

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वाहतूक कोंडी रोखण्यासह शेतमाल विक्री व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विविध नियमावली करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतमाल खरेदी विक्रीसाठी आलेल्या वाहनांशिवाय इतर वाहनांना २४ तास बंदी घालण्यात आली आहे. भाजीपाल्याची विक्री दुपारी १२ तर फळांची विक्री दुपारी २ वाजेपर्यंतच करण्याचे आदेश बाजार समिती प्रशासनाने बाजार घटकांना दिले आहेत. यासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. 

रविवारी (ता. २२) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. देशमुख बोलत होते. या वेळी आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ उपस्थित होते. श्री. देशमुख म्हणाले, की बाजार घटकांना आणि व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी विविध बाजार घटकांची बैठक घेण्यात आली होती. त्यानुसार सर्वांच्या समन्वयाने नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार बाजार आवारात केवळ भाजीपाला खरेदी विक्रीसाठी आलेल्या वाहनांनाच परवानगी देण्यात येणार आहे. इतर वाहनांना २४ तास बंदी घालण्यात आली आहे. शेतीमाल विक्रीच्या वेळादेखील ठरविण्यात आल्या असून, भाजीपाला विभागात दुपारी १२ वाजेनंतर तर फळ विभागात दुपारी २ वाजेनंतर विक्रीला बंदी घालण्यात आली आहे.

तसेच गाळ्या समोरील १५ फुटांच्या बाहेर शेतीमाल विक्री केल्यास दंडाची रक्कम अडीच हजार रुपयांवरुन ५ हजार रुपये आकारण्यात येणार आहे. तसेच बाजार आवारातील बनावट कामगार, हमाल, तोलणार आणि व्यापारी यांच्या संख्येवर मर्यादा आणण्यासाठी सर्व घटकांना ओळखपत्रे देखील देण्यात येणार आहेत. 

नव्या नियमावलींमुळे बाजार आवारातील विविध घटकांना शिस्त लागून शेतीमाल खरेदी - विक्री तातडीने आणि सुरळीत होईल. याचा सकारात्मक परिणाम शेतीमालाचे दर वाढण्यास होतील, असा विश्‍वास विलास भुजबळ यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com