दुग्धोत्पादकांना लिटरमागे १० ते १२ रुपयांचा फटका

बहूतांश संघांनी दूध दर कमी केल्याने गेल्या तीन महिन्यांपासून दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे. आतबट्ट्यातला दूध धंदा करताना शेतकरी त्रस्त झाला आहे. नगर जिल्ह्यात दर दिवसाला २७ लाख २६ हजार लिटर दूधसंकलन केले जात आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः अनेक शेतकऱ्यांसह बेरोजगारीवर मात करण्यासाठी अनेक सुशिक्षित तरुणांनी दुग्धव्यवसाय सुरू केला खरा, मात्र अलीकडच्या काळात या व्यवसायातून नफा नव्हे, प्रती लिटरमागे दहा ते बारा रुपयांचा फटका सोसावा लागत आहे. ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन लागू झाल्यावर मागणी घटल्याचे सांगून बहूतांश संघांनी दूध दर कमी केल्याने गेल्या तीन महिन्यांपासून दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे. आतबट्ट्यातला दूध धंदा करताना शेतकरी त्रस्त झाला आहे. नगर जिल्ह्यात दर दिवसाला २७ लाख २६ हजार लिटर दूधसंकलन केले जात आहे. 

जिल्ह्यात चौदा ते पंधरा लाख दुभती जनावरे असून गायीचे सुमारे २७ लाख लिटर तर राज्यात दोन कोटी लिटरच्या जवळपास दूध संकलन केले जाते. जिल्ह्यात साधारण पाच ते सात लाख लिटर म्हशीच्या दुधाचे उत्पादन होते. मात्र, उत्पादित होणारे बहुतांश दूध थेट ग्राहकांना घरपोच विकले जाते. गाईच्या दुधाचे मात्र वेगवेगळ्या दुध संघांकडून संकलन केले जाते. गेल्या काही वर्षांचा विचार करता शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय सातत्याने संकटात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ३.५ फॅट व ८.५ एफएनएस असलेल्या दुधाला सुमारे ३० ते ३२ रुपयांपर्यंत दर मिळत होता.

मात्र ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू झाले आणि पहिला घाव दूध व्यवसायावर पडला. दुधाला मागणी कमी झाल्याचे सांगत पहिल्या पंधरा दिवसांत पाच रुपयांनी तर त्यानंतर दर चार दिवसाला टप्प्याटप्प्याने दर कमी करत फेब्रुवारीमध्ये मिळणाऱ्या दराच्या तुलनेत सुमारे दहा ते बारा रुपयांनी दर कमी केले गेले. त्यामुळे दूध उत्पादकांना गेल्या तीन महिन्यांपासून प्रती लिटरमागे बारा रुपयांचा रुपयांचा फटका बसत आहे. राजकारण आणि दूध संघ चालकांचे साटंलोटं असल्याने हेळसांड होत असलेल्या दूध उत्पादकांकडे संकटाच्या काळातही दुर्लक्ष होत आहे.   दूध दिल्याशिवाय पर्याय काय? नगर जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी शेती करताना दुध व्यवसायाला प्राधान्य देतात. दूध संकलानासाठी गावगावांत दूध संकलन केंद्रे झाली आहेत. म्हशीपेक्षा गायीच्या दुधाचे प्रमाण जास्त आहे. ‘कोरोना’ आल्यापासून दुधाचे दर कमी केले आणि दूध उत्पादनात तोटा होऊ लागला. उत्पादक संताप व्यक्त करत असले तरी दूध विक्री करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही.   नगर जिल्ह्यातील दररोजच्या दूध संकलनाची स्थिती 

  • २ मल्टिस्टेट दूध संघ  :  ३४ हजार ७०६ लिटर  
  • १२ सहकारी दूध संघ  :  ६ लाख ९३ हजार लिटर
  • १५२ खासगी दूध संघ  :  १९ लाख ९९ हजार २६६ लिटर
  • दर दिवसाचे एकूण दूध संकलन  :  २७ लाख २६ हजार ९९२ लिटर  प्रतिक्रिया.. दूध उत्पादकांना सरकार आणि दूध खरेदीदार संघ नेहमीच वाऱ्यावर सोडत असल्याचे अनुभवले आहे. दूध व्यवसायिक यामुळे कायम आर्थिक अडचणीत येतात. कोरोना संसर्गाच्या नावाखाली दूध खरेदीचे दर कमी केले. मात्र, पुढे बंद पिशव्यातून विक्री केल्या जाणाऱ्या दुधासह दुधापासून तयार केलेल्या पदार्थाचे दर का कमी केले नाही. संघाची नियतच दूध उत्पादकांबाबत साफ नाही. - गुलाबराव डेरे, अध्यक्ष, कल्याणकारी दूध उत्पादक संघ.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com