सातारा जिल्ह्यात दूध उत्पादन सात लाख लिटरने घटले

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा : जिल्ह्यात दूध उत्पादनात घट झाली आहे. सध्या जिल्ह्यात प्रतिदिन १४ लाख दोन हजार १०० लिटर दुधाचे संकलन होत असून, गतवर्षीच्या तुलनेत दूध उत्पादनात सहा लाख ९५ हजार ४०० लिटरने घट झाली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. संकलन संस्थांकडून दूध दरात वाढ करण्यात आली असून, सध्या गायीच्या दुधास प्रतिलिटर २९ रुपये, म्हशीच्या दुधास प्रतिलिटर ३७ ते ३८ दर मिळत आहे. 

जिल्ह्यात माण, खटाव, खटाव, फलटण या तालुक्यांत शेतीला पूरक म्हणून मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो. त्यामुळे या तालुक्यांत सर्वाधिक दूध संकलन होते. जिल्ह्यात गतवर्षी डिसेंबर महिन्यात २० लाख ९७ हजार ५०० लिटर दूध संकलन होते. या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रतिदिन सरासरी १४ लाख दोन हजार ५०० लिटर दुधाचे संकलन होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत सहा लाख ९५ हजार ४०० लिटरने दूध उत्पादनात घट झाली आहे. जानेवारीपासून सुरू झालेला दुष्काळ, निर्माण झालेली चाराटंचाई यामुळे उत्पादनात घट झाल्याचे बोलले जात आहे. तसेच दुष्काळामुळे जनावरे संगोपन करणे अवघड झाल्याने जनावरांची विक्रीही मोठ्या प्रमाणात केली गेली. याचाही परिमाण उत्पादनावर होत आहे.

जिल्ह्यात सहकारी संस्थांकडून एक लाख ५०० लिटर, मल्टिस्टेट दूध संघांतून २९ हजार ३०० लिटर तर खासगी दूध संघांतून १२ लाख ७२ हजार ३०० लिटर दुधाचे संकलन झाले आहे. जिल्ह्यातील दूध संकलन करणाऱ्या बहुतांशी सहकारी संस्था अडचणीत आल्यामुळे या संस्थांकडून कमी प्रमाणात दूध संकलन होत आहे. सहकारी संस्थांच्या तुलनेत खासगी दूध संस्थांनी आघाडी घेतली असल्याने एकूण दूध संकलनाच्या तुलनेत ९० टक्के संकलन खासगी संस्थांकडून होत आहे.

सध्या या संस्थांमार्फत १४ लाख दोन हजार ५०० लिटर दुधाचे संकलन होत आहे. यामधील चार लाख १४ हजार ५०० लिटर दुधाचे पिशवीमध्ये पॅकिंग करून विक्री केली जात आहे. टँकरद्वारे पाच लाख २२ हजार २०० लिटर दूध विक्रीसाठी परजिल्ह्यांत जात आहे. तसेच ३ लाख २८ हजार १०० लिटर दूध भुकटी तयार करण्यासाठी केली जात आहे. तसेच ८५ हजार ७०० लिटर दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जात आहे. महानंदा संस्थेला दहा हजार लिटर दूध पाठवले जात आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com