सोलापुरात खरेदी केंद्रांवर मक्याची एकावेळी फक्त आठ क्विंटल खरेदी

मक्याची उत्पादकता कशी आणि कोणत्या पद्धतीने काढली गेली, हेच आम्हाला कळत नाही. शेतकऱ्यांचा विचार या यंत्रणा कधी करणार आहेत हा प्रश्न कायम आहे. शासनाच्या नियम, अटींमध्येच शेतकऱ्यांचे मरण होत चालले आहे. -उमाशंकर पाटील, शेतकरी, भंडारकवठे, जि. सोलापूर.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात किमान आधारभूत किमतीने खरेदीसाठी सात ठिकाणी मका खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. पण खरेदीसाठी एकरी सरासरी उत्पादकता ग्राह्य धरत या केंद्रांवर शेतकऱ्यांना एकावेळी फक्त आठ क्विंटलची मर्यादा देण्यात आली आहे. शासनाच्या या नियम आणि अटींमुळे शेतकऱ्यांची पुरती कोंडी झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात मका खरेदीसाठी माळकवठे (ता. दक्षिण सोलापूर), अनगर (मोहोळ), पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, अकलूज आणि नातेपुते (ता.माळशिरस) या सात ठिकाणी केंद्रे सुरू केली आहेत. या खरेदी केंद्रांना काही अटी व शर्तींवर मान्यता दिली आहे. पण या केंद्रांबरोबरच आता शेतकऱ्यांनाही मका खरेदीसाठी नियम, अटी लादण्यात आल्या आहेत.

कृषी विभागाने सोलापूर जिल्ह्याची मक्याची सरासरी एकरी उत्पादकता ७ क्विंटल ६४ किलो ( सर्वाधिक आठ क्विंटलपर्यंत) इतकी दाखवली आहे. त्या आधारावर खरेदी केंद्रांकडून आता प्रतिशेतकरी ७ क्विंटल ६४ किलो इतकीच मका खरेदी केली जात आहे. वास्तविक, अनेक शेतकऱ्यांची मका उत्पादकता २० ते ३० क्विंटलपर्यंत आहे. तसे उत्पादनही त्यांनी घेतले आहे. पण कृषी विभागाने इतक्या कमी प्रमाणात मक्याची उत्पादकता दाखवली आहे. त्यामुळे आठ क्विंटलपर्यंत मका खरेदी केंद्रावर देऊन बाकी मका विकायचा कुठे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पणन विभाग सरासरी उत्पादकतेनुसारच खरेदी होणार आणि कृषी विभाग आम्ही दाखवलेली उत्पादकता बरोबर आहे, असे म्हणत दोन्हीही यंत्रणा नियमांवर बोट ठेवत असल्याने शेतकऱ्यांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे.

पीक कापणी प्रयोगावर आधारित उत्पादकता काढली जाते. शासनाच्या नियमानुसारच हे प्रयोग केले जातात. नियमाच्या पुढे आपण कसे करणार, तरीही शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन दुरुस्तीसाठी आपण तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवू, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  बसवराज बिराजदार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com