बार्शीटाकळी तालुक्यात बहरले जवस

बार्शीटाकळी तालुक्यात बहरले जवस
बार्शीटाकळी तालुक्यात बहरले जवस

अकोला : सध्याच्या पीकपद्धतीत शेतशिवारातून कालबाह्य झालेल्या जवस पिकाला पुन्हा एकदा चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात या हंगामात दोन ठिकाणी जवसाचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले असून हे पीक जोमदारपणे वाढत आहे. सध्या बहरलेले हे पीक शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा विषय बनला आहे.

नागपूर येथील कृषी महाविद्यालयाअंतर्गत अखिल भारतीय समन्वित जवस संशोधन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात जवसाचे प्रथम रेषीय प्रात्यक्षिक प्रकाश माणिकराव यांच्या शेतात घेतले जात आहे. जवसाच्या पीकेव्ही एनएल २६० या वाणाची १९ नोव्हेंबरला माणिकराव यांच्या शेतात पेरणी करण्यात आली. अखिल भारतीय जवस संशोधन प्रकल्पाचे समन्वयक डॉ. जीवन कतोरे यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी पीक व्यवस्थापन, खत आणि पाणी नियोजन केले आहे. या पिकावर येणाऱ्या गाद माशी नियंत्रणाच्या योग्य उपाययोजनादेखील केल्या आहेत. सद्यःस्थितीत पीक बोंडे धरण्याच्या अवस्थेत असून सुमारे एक महिन्यांनी काढणीस येईल.

जवस पिकाच्या या प्रथम प्रात्यक्षिकाची पाहणी जवस पैदासकार डॉ. बिना नायर, मोहरी पैदासकार डॉ. संदीप कामडी व जवस कृषी विद्यावेत्ता डॉ. जीवन कतोरे यांनी केली. प्रकाश माणिकराव यांना एका एकरामध्ये ५ते ६ क्विंटल उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे. जवसाचे पीक सध्या कुणीही घेत नाही. रब्बीमध्ये जवस, मोहरीसारखे पीक कालबाह्य झाले. 

याबाबत माहिती देताना डॉ. कतोरे म्हणाले, की ‘‘जवस हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. महाराष्ट्रात या पिकाखालील मोठे क्षेत्र आहे. परंतु, इतर पिकांच्या स्पर्धेमुळे या पिकाचे क्षेत्र कमी होत चालले आहे. जवस पिकास थंड हवामान उपयुक्त असून हे पीक जिरायती आणि बागायती लागवडीस योग्य आहे. या पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित व वेळेवर लागवड करणे, सुधारित वाणाचा वापर आणि किडी व रोगापासून संरक्षण या बाबीकडे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. जवस हे मानवी आरोग्याच्या दृष्टीनेही हितकारी आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com