राज्यात विक्रमी ३६ लाख क्‍विंटल कापूस खरेदी 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः बाजारात दर कोसळल्याने सीसीआय आणि पणन महासंघाला कापूस देण्याकडे राज्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे २०१४-१५ या वर्षातील २६ लाख क्‍विंटल कापूस खरेदीचा विक्रम मोडीत काढीत या वर्षी आजवर तब्बल ३६ लाख क्‍विंटल कापसाची खरेदी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने केली आहे. येत्या काळात ही खरेदी ४० लाख क्‍विंटलचा टप्पाही पार करेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. 

गेल्या हंगामात कापसाचे दर साडेपाच हजार रुपये क्‍विंटलच्या पुढे गेले होते. त्यामुळे या वर्षीचा हंगामदेखील कापूस उत्पादनाला पोषक राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यामुळेच राज्याच्या ३९ लाख हेक्‍टर सरासरी कापूस लागवड क्षेत्राच्या तुलनेत अधिक म्हणजेच ४२ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड करण्यात आली. क्षेत्र वाढले असले तरी मॉन्सूनोत्तर अवकाळी पावसामुळे कापूस उत्पादन आणि प्रत मात्र खालावली. त्यातच बाजारात ४५०० ते ५००० रुपये क्‍विंटल दराने कापसाचे व्यवहार होत आहेत. कापूस उत्पादकांची अशी चौफेर कोंडी झाली असतानाच बाजारात हस्तक्षेप करीत सीसीआय व पणन महासंघाकडून हमीभावाने खरेदीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. 

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ ११३ केंद्रांच्या मध्यमातून कापूस खरेदी करीत आहे. २००४-०५ मध्ये महासंघाकडून तब्बल २६ लाख क्‍विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. त्या वेळीदेखील बाजारात भाव पाडण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. या वर्षीदेखील तीच स्थिती निर्माण झाल्याने आजवर सुमारे ३६ लाख क्‍विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. येत्या काळात ४० लाख क्‍विंटल कापूस खरेदी टप्पा पूर्ण होईल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.   

तो विक्रम अद्यापही कायम 

२००४-०५ या वर्षात उच्चांकी आणि विक्रमी २११ लाख क्‍विंटल कापसाची खरेदी पणन महासंघाला करावी लागली होती. महासंघाचे तत्कालीन व्यवस्थापक गोविंद वैराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००४-०५ या वर्षात २५०० रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला होता. बाजारात मात्र कापसाचे व्यवहार १९०० ते २००० रुपयांनीच होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी महासंघाकडे कापूस विक्रीसाठी गर्दी केली होती. त्या वेळी ४६५ केंद्रे, ७६५ जिनिंगचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. तब्बल साडेपाच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती यासाठी करावी लागली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com