नियमित कर्जदारांसाठी वेगळे धोरण : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जेष्ठ नेते शरद पवार यांच्याशी संवाद साधताना
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जेष्ठ नेते शरद पवार यांच्याशी संवाद साधताना

पुणे  : “शेतकरी हाच राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. लोकांच्या आयुष्यात गोडवा आणणाऱ्या शेतकऱ्याच्या आयुष्याचे चिपाड होऊ देणार नाही. शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून सरकार काम करेल. तो उद्ध्वस्त होऊ नये, यासाठीच आम्ही कर्जमाफी आणली आहे. आता नियमित कर्जदारांसाठी वेगळे धोरण तयार होत आहे. दोन लाखांवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांबाबत देखील वेगळा निर्णय घेण्याकरिता बॅंकांकडून माहिती मागविली आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बळिराजाला दिलासा दिला. 

मांजरी (ता. पुणे) येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अर्थात ‘व्हीएसआय’च्या ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व पुरस्कार वितरण सोहळ्यात गुरुवारी (ता.२५) ते बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ‘व्हीएसआय’चे विश्वस्थ व अर्थमंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील, ‘इस्मा’चे अध्यक्ष आ. रोहित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, प्रकाश आवाडे, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, ‘विस्मा़चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे व इतर मान्यवर होते.

साखर उद्योग गोडवा आणतो साखर उद्योगासाठी व्हीएसआय; तसेच शरद पवार यांच्या योगदानाचा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात वारंवार उल्लेख करीत गौरव केला. ‘‘उसापासून साखर तयार करणारा हा उद्योग राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. तुम्ही जगभर साखर पोचवता. जगात गोडवा वाटतात आणि आमच्याही आयुष्यात गोडवा आणता आहात,’’ असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले.

‘व्हीएसआय’च्या व्यासपीठावर जातानाच श्री. ठाकरे यांनी व्यासपीठाला वाकून वंदन केले. श्री. पवार यांच्याविषयी आदराची भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, “या ठिकाणी मी जर काही चुकीचे बोललो तर त्यासाठी पवार साहेबांना जबाबदार धरावे. कारण, माझ्या वडिलांचे मित्र या नात्याने त्यांनीच मला सांगितले की तुला मुख्यमंत्रिपद सांभाळायचे आहे. आम्हा शहरवासीयांना चहा गोड करणारी साखर इतकीच साखरेची ओळख आहे. मात्र, व्हीएसआयमध्ये साखरेवर जागतिक दर्जाचे संशोधन, तंत्रज्ञान व अभियांत्रिकीची काम चालते. हा विषय माझ्या डोक्यावरून जाणारा आहे. पण, तुमचे कार्य पाहून मला हात जोडून नम्र व्हावेसे वाटते.”

सहकार आणि राजकारण वेगळे नाहीच राज्याच्या राजकीय नेत्यांनीच सहकार वाढविला. यशवंतराव चव्हाण यांनी सहकाराची बीजे रोवली. आज सहकारातून साखर कारखानदारी उभी राहिली नसती, तर राज्याची अवस्था उत्तर प्रदेशसारखी झाली असती. त्यामुळे सहकारापासून राजकारण वेगळे होऊ शकत नाही. ही एक घट्ट वीण आहे. खासगी कारखाने देखील येत असून त्याचा आनंद आहे; पण सहकार म्हणजे उसाच्या मोळीसारखा आहे. एक ऊस मोडता येतो. उसाची मोळी मोडता येत नाही तशी ही सहकारातील एकजूट आहे. आम्ही शाळेत जाताना उसाच्या गुऱ्हाळात रस प्यायचो. आमचे लक्ष तेव्हा फक्त गोड उसाकडे होते. मात्र, रस देऊन बाहेर पडणाऱ्या चिपाडाकडे लक्ष नव्हते. माझ्या शेतकऱ्याच्या आयुष्याचे चिपाड होऊ नये याची काळजी घेतली जाईल,” अशी ग्वाही श्री.ठाकरे यांनी दिली.

देशाची अर्थव्यवस्था कोमात देशातील शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते आहे. जगात मंदी आहे हे खरे आहे. भारतीय अर्थव्यवस्था कोमात जात असल्याचे पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी सांगितले आहे. मात्र, आपण आपल्या राज्यात शेतीव्यवस्थेला सांभाळण्यासाठी खतपाणी देऊ. त्याला दमदार करू. त्याला कर्जमुक्त करू. कर्जमाफीबाबत दोन लाखांच्या वरील शेतकऱ्यांचा विचार केला जाईल, असा शब्द मी तुम्हाला देतो. त्यासाठी माहिती मागविली जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

‘व्हीएसआय’ला जालना येथे जागा मागील सरकारने व्हीएसआयला जालना भागात जागा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते पूर्ण न झाल्याचा उल्लेख श्री. पवार यांनी केला. तो धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले की, साखर उद्योग आपल्याला रस देतो, गोडवा देतो, वीजनिर्मितीच्या माध्यमातून प्रकाशदेखील देतो. संशोधनात जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या या संस्थेचा मला अभिमान वाटतो. व्हीएसआयला जागा देण्याचे आश्वासन मागे दिले गेले असेल. तेव्हा आम्ही अर्धवट होतो (हशा). अर्धवट म्हणजे अर्धे होतो. निर्णय हे बोलाचे भात आणि बोलाची कढी होते. त्यामुळे घोषणा झाल्या असतील; पण आता व्हीएसआयला जालना येथे संशोधन केंद्राला जागा दिली जाईल. जयंतराव पाटील यांनी तसा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणावा. सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी या उद्योगाच्या पाठीशी उभे राहील.

शेतकऱ्यांचा चेहरा आनंदी करू ः पवार माजी केंद्रीय कृषिमंत्री श्री. पवार म्हणाले, “व्हीएसआयच्या सभेला मुख्यमंत्री आले ही आनंदाची बाब आहे. शेतीक्षेत्राला मदत करण्याची त्यांची दृष्टी आहे. त्यांच्या मदतीने आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा चेहरा आनंदी करू. वसंतदादा पाटील, शंकरराव मोहिते पाटील, शंकरराव कोल्हे, तात्यासाहेब कोरे, यशवंतराव मोहिते पाटील यांनी दृष्टी ठेवून ४३ वर्षांपूर्वी व्हीएसआयची स्थापना केली. ऊस, साखर, उपपदार्थ याविषयी संशोधन व तांत्रिक ज्ञान देणारी जगातील ही अव्वल संस्था आहे. या कामात सरकारचे पाठबळ मिळेल अशी अपेक्षा मला आहे.”

स्पर्धेत उतरावे लागेल “ऊस विकासाबाबत आपण आताच कारखान्यांना पारितोषिके दिली आहेत; पण अजूनही काम करावे लागेल. या पिकात क्रमांक एकवर आपण होतो. आता ती जागा उत्तर प्रदेशने घेतली आहे. या स्पर्धेत कोणी पुढे जात असेल तर आपल्याला स्थिती बदलावी लागेल. ऊस उत्पाकता, साखर उतारा वाढ, पाणी बचत यात काम करावे लागेल. शेतकऱ्यांना चांगल्या बेण्याचा पुरवठा व तांत्रिक मार्गदर्शन करावे लागेल, असा सल्ला श्री. पवार यांनी दिला.

शेतकरी व कारखान्यांचा पुरस्काराने गौरव मुख्यमंत्री व श्री. पवार यांच्या हस्ते या वेळी प्रयोगशील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसभूषण पुरस्कार देण्यात आले. उत्तम व्यवस्थापन, आर्थिक सुधारणा, प्रभावी लागवड, तांत्रिक सुधारणेत उत्कृष्ठ काम केलेले कारखाने; तसेच आदर्श कर्मचाऱ्यांनाही पुरस्कार देण्यात आले. या वेळी व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी साखर उद्योगविषयक विविध मुद्द्यांची माहिती सभेला दिली. मुख्यमंत्र्यांनी या वेळी कार्यक्षमता अहवाल व साखर संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन केले.

कमी जागेत जास्त पीक घेतात ‘व्हीएसआय’मधील संशोधन आणि मेहनती ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कामाचा उल्लेख करीत मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, जीवाची बाजी लावून कमी जागेत जादा उत्पादन शेतकरी घेतात. त्यांचे कौतुक करायलाच हवे. व्हीएसआयमध्ये आज असे पुरस्कार या शेतकऱ्यांना दिले गेले. कारण, या संस्थेचे नेतृत्व पवार साहेबांकडे आहे. अर्थात, कमीत कमी आमदारांमध्येही त्यांनीच चमत्कार करून दाखविला आहे. (हशा). आमच्या जास्त म्हणून आमचेच पीक येणार असे कोणी म्हणून नाही. उलट कमी जागेत आम्ही जास्त पीक घेतो आणि कारण आम्ही करून दाखविले आहे (हशा), अशा शब्दांत श्री.ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

मळी निर्यातीवर बंदीचा विचार सुरू सहकारमंत्री जयंत पाटील यांनी साखर कारखान्यांमधीळ मळीबाबत निर्यात बंदीचे संकेत दिले. “महाराष्ट्रात मळी दर आताच सहा हजार असून तो दहा हजार होईल. इथेनॉलपेक्षाही मळी विकून काम चालू शकते, असे कारखान्यांना वाटते. अर्थात, त्याचा परिणाम मद्यार्क निर्मितीवर होत आहे. मळी निर्यातीवर बंदी आणण्याची मागणी होत असून त्याचा विचार करू, असे श्री.पाटील यांनी स्पष्ट केले.

क्षणचित्रे...

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे मित्र नव्हे, तर सहकारी असा उल्लेख बाळासाहेब थोरात व अजितदादांकडे पाहून केला. भविष्यात सहकारी होऊ शकतात, असे ते हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाहून म्हणताच हशा पिकला.
  • व्यासपीठावर जयंत पाटील यांच्या शेजारी अजितदादांची बसण्याची व्यवस्था केली होती. दादांनी मात्र आपल्या नावाची पाटी उचलून तेथे बाळासाहेब थोरात यांची पाटी ठेवली व स्वतः हर्षवर्धन पाटील यांच्या शेजारी बसले. 
  • शेतकरी व कारखानदारांकडून पुरस्कार स्वीकारले जात असताना श्री.ठाकरे व श्री.पवार यांच्या हाताला स्पर्श करून कृतज्ञता व्यक्त केली जात होती.
  • पुरस्कार वितरणाच्यावेळी शेतकरी व कारखानदारांमध्ये अमाप उत्साह होता. त्यामुळे व्यासपीठावर मोठी गर्दी होत असे. या गर्दीतही अजितदादांबरोबर ‘सेल्फी’ काढून घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत होते. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com