खानदेशात पपईचा हंगाम सुरू 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  ः खानदेशात पपईचा हंगाम सुरू झाला असून, अनेक भागांत काढणी सुरू झाली आहे. सुरुवातीलाच पपईचे दर टिकून असून, शेतकऱ्यांना जागेवरच प्रतिकिलो १० रुपये दर मिळत आहे. हा दर कमी असल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. 

खानदेशात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार व तळोदा भागांत पपईची लागवड अधिक होते. तसेच जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर आणि धुळ्यातील शिरपूर, धुळे व शिंदखेडा तालुक्‍यांतही पपईचे पीक घेतले जाते. मागील वर्षी उन्हाळ्यात भीषण दुष्काळ होता. यामुळे अनेक भागांत पपई लागवडीवर परिणाम झाला. लागवड सुमारे एक ते दीड हजार हेक्‍टरने कमी झाली होती.

सुमारे तीन हजार हेक्‍टरवर पपई पीक आहे. तापी व पांझरा, अनेर नदीच्या लाभक्षेत्रासह सातपुडा पर्वतालगतच्या भागात मात्र शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसर करून वापर करून हे पीक जगविले. आजघडीला नंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यांत पीक जोमात आहे. पपईची काढणी आठ दिवसांपूर्वी जोमात सुरू झाली. 

परराज्यांसह राज्यात मागणी  राजस्थान, मध्य प्रदेश आणि जळगाव जिल्ह्यांतील रावेर, धुळ्यातील शिंदखेडा व नंदुरबारमधील शहादा येथील व्यापारी थेट शेतात जाऊन खरेदी करीत आहेत. पपईला २० ते २५ दिवसांपूर्वी प्रतिकिलो १८ रुपये दर होता. आगाप लागवडीच्या पपई बागांमधील काढणी वेगात सुरू आहे. दोन-तीनदा आगाप पपई बागांमध्ये काढणी झाली आहे. पपईला राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात व राज्यांतही मागणी आहे. बाजार समित्यांमध्ये पपईची आवक फारशी नाही. सध्या दर्जेदार फळे निघत असून, थंडी वाढली तर पपईला मागणी वाढेल, असे नंदुरबार येथील शेतकरी रोहित पटेल यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com