सरकी ढेप, सोयाबीन दरातील वाढीचा ‘ट्रेंड’ कायम राहणार

आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मी आहे. सोयाबीन बाजारात ४ हजार ८०० ते ५ हजार रुपयांच्या पातळीवर गेले तर नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्हज्‌ एक्स्चेंजवर फ्युचरचे दर ५ हजार २०० रुपयांपर्यंत जाऊ शकतात. - वंदना भारती,संशोधन प्रमुख, एसएमसी, दिल्ली
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई ः देशातील अनेक भागांत २०१८ मधील दुष्काळ आणि यंदा पीक काढणीच्या काळातील अतिवृष्टीमुळे कमोडिटी मार्केटमधील दरातील वृत्ती बदलली. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात शेतीमालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे बहुतेक शेतीमालातील दरवाढ ही २०२० मध्ये कायम राहणार आहे. विशेषतः पहिल्या सहामाहीत दर वाढलेले दिसतील. सरकी ढेप (सरकी पेंड), सोयाबीन दरातील ‘ट्रेंड’ कायम राहील आणि सोयाबीन यंदा फ्युचरवर ५२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज कमोडिटी मार्केटमधील जाणकारांनी व्यक्त केला.

देशातील शेतीसाठी २०१८ आणि २०१९ हे दोन्ही वर्षे कसोटीची ठरली. २०१८ मध्ये पडलेला दुष्काळ आणि २०१९ मध्ये मॉन्सूनचे उशिरा आगमन, अतिवृष्टी आणि अतिपावसामुळे उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे २०१९ मध्ये बहुतेक शेतीमालाचे दर वाढले होते. मार्केटमधील जाणकारांच्या मते, प्रतिकूल हवामानामुळे कापूस आणि सोयाबीन पिकांच्या उत्पादनात झालेली आणि पशुखाद्य उद्योगातून दोन्ही कमोडिटींना वाढणारी मागणी लक्षात घेता २०२० मध्ये सरकी ढेप आणि सोयाबीनचे दर वाढतील. या दोन्ही कमोडिटी सर्वाधिक दरवाढीच्या दृष्टीने आशादायक आहेत. सोयाबीन दरातील वाढीचा ‘ट्रेंड’ कायम राहून फ्युचरवर क्विंटलला ५२०० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. सोयाबीनच्या विक्रमी दरामुळे इतर तेलबियांच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. 

सोयाबीन यंदा सोयाबीन उत्पादनात घट झाल्याने दर मागील चार वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहेत. काही अहवालानुसार, अंदाजित ९० ते १२० लाख टन उत्पादनात १० ते १५ टक्के घट होण्याची शक्यता आहे. परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत आवकेचा विचार करता उत्पादनात २५ टक्के घट होऊन उत्पादन ८० लाख टनांपेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे.   

कोटक सिक्युरिटीजमधील कमोडिटी रिसर्चचे प्रमुख रवींद्र राव म्हणाले, ‘‘मॉन्सूनचे उशिरा झालेले आगमन आणि पीक वाढीच्या काळात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा परिणाम सोयाबीन उत्पादनावर झाला आहे. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये सोयाबीन ४ हजार ८०० रुपयांवर पोचण्याची शक्यता आहे.’’

केडिया कॅपिटल सर्व्हिसेसचे अजय केडिया म्हणाले, ‘‘सोयाबीन दर ४ हजार ८५० रुपयांवर जातील.’’  दिल्ली येथील एसएमसीच्या संशोधन प्रमुख वंदना भारती म्हणाल्या, ‘‘सोयाबीनचे दर आत्तापर्यंतच्या विक्रमी ४ हजार ८०० ते ५ हजार रुपयांच्या पातळीवर गेले, तर नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्हज् एक्स्चेंजवर फ्युचरचे दर ५ हजार २०० रुपयांपर्यंत जाऊ शकतात. सध्या बाजारातील आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मी आहे.  मोहरीचे नवीन पीक बाजारात येण्यास केवळ सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी असला, तरीही बाजारात मोहरीचे दर लवकरच ५ हजारांपर्यंत पोचतील. सोयातेल आणि पामतेलाचे दर वाढल्याने इतर तेलबियांचे दरही वाढत आहेत. 

सरकी ढेप (पेंड) पश्चिम, दक्षिण आणि उत्तर भारतात पशुधनाच्या खाद्यात सरकी ढेपेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. २०१९ च्या मध्यानंतर कापूस पिकाला प्रतिकूल वातावरण असल्याने सरकी ढेपेचे दरही यंदा वाढण्याची शक्यता आहे. अहमदाबाद येथील पॅराडियम कमोडिटी अ‍ॅडव्हायझर्सचे बिरेन वकील म्हणाले, ‘‘शेतीमालाचा विचार करता सरकी ढेपेचे दर हे २०२० मध्ये सर्वाधिक वाढलेले असतील.’’सप्टेंबर महिन्यात विक्रमी ३ हजार ६९८ रुपये प्रतिक्विंटलवर गेल्यानंतर विक्रमी कापूस उत्पादनाच्या अंदाजानंतर सरकी ढेपेचे दर पुन्हा कोसळले. मात्र, ३८० ते ४०० गाठी कापूस उत्पादनाच्या अंदाजाऐवजी ३५० लाख गाठींचा सुधारित अंदाज व्यक्त केल्यानंतर सरकी ढेप २ हजार २०० रुपयांवर पोचली. एक क्विंटल कापसापासून सरासरी ३० किलो रुई आणि ७० किलो सरकी मिळते. गेल्या वर्षी जुलैपर्यंतचा भीषण दुष्काळामुळे पशुखाद्याचा पुरवठा घटला होता. तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले, त्यामुळे पशुखाद्याचे दर वाढले आहेत.

ॲगकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिन रावल म्हणाले, ‘‘की सरकी ढेपेचे दर हे सामान्य मॉन्सूनवर अवलंबून आहे. जूनपर्यंत सरकीचे दर २ हजार ६०० ते २ हजार ८०० रुपयांवर पोचण्याची शक्यता आहे.’’ रावल यांच्या मते २०२० मध्ये सरकी हे सर्वाधिक वाढणारी कमोडिटी असेल. तर काही व्यापाऱ्यांच्या मते, जूनपर्यंत सरकी ३ हजार २०० रुपयांपर्यंत पोचलेली असेल.    कापूस कापूस बाजारात प्रतिगाठीचा (एक गाठ- १७० किलो) दर दीर्घ काळासाठी १८,५०० ते १८,९०० रुपये राहिल्यानंतर चीन आणि अमेरिकेतील झालेले करार, तसेच चीन आणि बांगलादेशकडून होणारी कापसाची विचारणा येणाऱ्या काही महिन्यांत कापूस दर वाढण्याची शक्यता आहे. तसेच सीसीआयने व्यक्त केलेला खरेदीचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. इंडिया निवेश कमोडिटीजचे मनोज जैन म्हणाले, ‘‘जगातील महत्त्वाच्या दोन देशांमधील व्यवहार करार झाल्यानंतर जागतिक कापूस बाजाराचा आलेख हळूहळू बदलत आहे. २०२० मध्ये कापसाचे दर वाढतील. चीन अमेरिकेतून येणाऱ्या कापसावरील शुल्क माफ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनकडून या वर्षात मागणी वाढेल.’’    आंतरराष्ट्रीय घटकांचा परिणाम आंतरराष्ट्रीय घटकांचा विचार करता चीनकडून पामतेलाची मागणी वाढली आहे. चीन मध्ये पामतेल हे मुख्य खाद्यतेल आहे. तर, इंडोनेशिया आणि मलेशियात जैविक इंधनामध्ये पामतेलाचा वापर वाढला आहे. त्यामुळे इंडोनेशिया आणि मलेशियातील पामतेलाचे दर वाढले आहेत. पामतेलाचे दर वाढल्याने पर्यायी सोयाबीनच्या दरातही अपेक्षेप्रमाणे वाढ झाली आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षपणे इतर तेलबियांच्या दरातही सुधारणा झाली. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात बहुतेक शेतीमालाचे दर वाढलेले आहे. त्याचाही फायदा भारतीय शेतीमालाला होणार आहे. विशेषतः पहिल्या सहामाहीत दर वाढलेले दिसतील, असेही मार्केटमधील जाणकारांनी सांगितले. 

प्रतिक्रिया

जूनपर्यंत सरकीचे दर २ हजार ६०० ते २ हजार ८०० रुपयांवर पोचण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये सरकी सर्वाधिक वाढणारी कमोडिटी असेल.  - नलिन रावल, मुख्य कार्यकारी अधिकारी, ॲगकॉन

जगातील महत्त्वाच्या दोन देशांमधील व्यवहार करार झाल्यानंतर जागतिक कापूस बाजाराचा आलेख हळूहळू बदलत आहे. २०२० मध्ये कापसाचे दर वाढतील. - मनोज जैन, इंडिया निवेश कमोडिटीज्   जाणकारांच्या मते...

  • सोयाबीनमधील तेजीमुळे इतर तेलबियांचेही दर वाढतील
  • ढेपेच्या वाढत्या मागणीमुळे कापूस दरातही वाढ होईल 
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे गवारीतही तेजी येईल
  • आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढीचा भारतीय कमोडिटीला फायदा
  • मोहरी लवकरच पाच हजारांचा आकडा गाठेल
  • जूनपर्यंत सरकीचे दर ३२०० रुपयांपर्यंत पोचतील
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com