हापूस निर्यातीसाठी ‘मॅंगोनेट’वर रत्नागिरीतील ९३७ बागायतदारांची नोंदणी

हापूस निर्यातीसाठी ‘मॅंगोनेट’वर रत्नागिरीतील ९३७ बागायतदारांची नोंदणी
हापूस निर्यातीसाठी ‘मॅंगोनेट’वर रत्नागिरीतील ९३७ बागायतदारांची नोंदणी

रत्नागिरी  ः हापूसच्या निर्यातवृद्धीसाठी जास्तीत जास्त बागायतदारांनी पुढाकार घ्यावा, याकरिता शासनाने मँगोनेट प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीत निर्यातीसाठी जानेवारी महिन्यात सर्वाधिक नोंदणी झाली असून, जिल्ह्यातील ९३७ नवीन आंबा बागायतदार निर्यातीसाठी सज्ज झाले आहेत. गेल्या सहा वर्षांत जिल्ह्यातील ४३३६ बागायतदारांनी ‘मॅंगोनेट’वर नोंदणी केली आहे.

‘मँगोनेट’द्वारे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात हापूस परदेशात निर्यात केला जातो. युरोप, जपान, अमेरिका येथील आयातदार रत्नागिरीतील थेट बागायतदारांच्या बागेत जाऊन पाहणी करतात. थेट संपर्कामुळे बागायतदारांनाही चांगला दर मिळतो. यासाठी मँगोनेट प्रणाली सहा वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. या प्रणालीची पणनसह कृषी विभागाकडे जबाबदारी आहे.

मॅंगोनेटवर नोंदणीदरम्यान बागायतदार कोणत्या देशात हापूसची निर्यात करण्यास इच्छुक आहे, त्याची माहिती ऑनलाइन नोंदवून त्या देशांच्या सूचनेनुसार कोकणातील हापूस बागांचे व्यवस्थापन केले जाते. २०१४-१५ पासून मँगोनेट ही प्रणाली कार्यान्वित झाली. दरवर्षी नोंदणीकृत बागायतदारांच्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करण्यात येते. फेब्रुवारीपर्यंत बागायतदारांना नोंदणी करता येते. जानेवारीअखेरपर्यंत नोंद करणाऱ्यांना अमेरिका, न्यूझीलंडमध्ये आंबा निर्यात करता येतो. ‘मँगोनेट’वर बागेची नोंद झाल्यानंतर तेथील फवारणी, खतांची स्थिती, कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांच्या नोंदी ठेवणे आवश्यक असते.

यंदा जिल्ह्यातील ९३७ बागायतदारांनी ‘मँगोनेट’अंतर्गत नोंदणी केली. ३,३९९ बागायतदारांनी प्रमाणपत्र नूतनीकरण केले. २०१४-१५ मध्ये १७०६, २०१५-१६ मध्ये २३४, २०१६-१७ मध्ये १९३, २०१७-१८ मध्ये ३३ बागायतदारांनी नोंदणी केली होती. गतवर्षी ८३५ शेतकऱ्यांनी ‘मँगोनेट’व्दारे नव्याने नोंदणी केली होती. डिसेंबरअखेरपर्यंत अवघ्या पाच बागायतदारांचा नोंदणीसाठी प्रतिसाद मिळाला होता; मात्र एप्रिल महिन्यात आंबा मोठ्या प्रमाणात येण्याची स्थिती असल्यामुळे निर्यातीवर भर देण्यासाठी बागायतदारांनी जानेवारी महिन्यात नोंदणी केली आहे.  

पणन मंडळाचे सहव्यवस्थापक भास्कर पाटील म्हणाले, की निर्यातीसाठी आंबा बागायतदारांची मानसिकता तयार व्हावी, यासाठी लवकरच कार्यशाळेचे आयोजन केले जात आहे.  

तालुकानिहाय मँगोनेटद्वारे नोंदणी स्थिती
तालुका नवीन नोंद सहा वर्षांतील नोंद
चिपळूण २८  १११
दापोली २२८ १०४६
गुहागर  ३५  १२०
खेड ५२  ३२४
लांजा  २२४
मंडणगड  ६३ २३१
राजापूर  २०७ ८१८
रत्नागिरी  २९५  १३४७
संगमेश्वर २० ११५
एकूण ९३७   ४३३६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com