सोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेत

सध्या देशभरातील बाजारात चार ते पाच लाख क्विंटल सोयाबीन आवक होत आहे. मागील वर्षी यापेक्षा दुप्पट आवक होती. - ए. के. अगरवाल,अध्यक्ष, इंदोर व्यापारी असोसिएशन
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये पीक काढणीच्या काळात अतिवृष्टी झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यातच जागतिक बाजारात पाम तेलाचा घटलेला पुरवठा आणि वाढत्या दरामुळे सोयाबीनला मागणी वाढली आणि दरात वाढ झाली आहे. सध्या सोयाबीन ४ हजार २०० रुपायांवर पोचले असून येत्या महिनाभरात विक्रमी ४ हजार ९०० रुपयांवर पोचण्याची शक्यता आहे. 

सोयाबीन हे तेलबिया पिकांमध्ये महत्त्वाचे पीक आहे. ‘‘सरकारने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा सोयाबीन उत्पादनात अधिक घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात वाढ होणार असल्याचेही व्यापाऱ्यांनी म्हटले आहे,’’ असे कोहिनूर फिड ॲन्ड फूड लि. चे व्यवस्थापकीय संचालक ए. जे. पंजवाणी म्हणाले.  देशातील एकूण तेलबिया उत्पादनात ३० टक्के हिस्सा हा सोयाबीनचा आहे.

मंगळवारी जानेवारीच्या करारासाठी ‘एनसीडीएक्स’वर सोयाबीनचे व्यवहार विक्रमी प्रतिक्विंटल ४ हजार २२८ रुपयाने झाले. इंदोर येथील बाजारात ३७१० रुपये हमीभावापेक्षा जास्त ४१५० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलने सोयाबीनचे व्यवहार झाले. ‘‘सोयाबीन उत्पादनात घट झाल्यामुळे येत्या महिन्यात दर ४ हजार ९०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे,’’ अशी माहिती जाणकार गोविंदभाई पटेल यांनी दिली.  

‘‘देशातील मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे,’’ असे आयसीएआरच्या तज्ज्ञांनी सांगितले. बाजारातील आवक निम्म्याने कमी असल्याने सोयाबीन उत्पादन ‘सोपा’ने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा कमी, ८० ते ८२ लाख टन होण्याची शक्यता आहे, असे चीन येथील खाद्यतेल उद्योगाने म्हटले आहे. 

देशात सोयाबीन तेलपुरवठा आणि मागणी यात तफावत असल्याने आयात केली जाते. २०१८-१९ मध्ये आयात १.५ टक्क्यांनी वाढून ३१ लाख टनांवर पोचली होती. पामतेल आणि सोयाबीन हे एकमेकांना पूरक आहे. दोन्हींचा वापर इंधनात मिश्रणासाठी करता येतो. त्यामुळे एकाचे दर वाढल्यास दुसऱ्या तेलाचेही दर वाढतात. खाद्यतेल आयात कमी झाल्यास देशात सोयाबीन तेलाचे दर वाढतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

पामतेलाचे दर वाढले जागतिक बाजारात सोयाबीनसह पामतेलाचेही दर वाढले आहेत. मलेशियन बोर्सवर कच्च्या पामतेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी ४९ हजार ८४५ रुपये टनांवर पोचले आहेत. कमी पुरवठा आणि अग्नेय आशियातील देशांमध्ये इंधनात मिश्रणासाठी वाढलेल्या मागणीमुळे पामतेलाचे दर वाढले आहेत, असे इंटेलिटरॅडे ॲन्ड मॉनेटरी सर्व्हिसेस ॲनॅलिस्ट सुरेश मंत्री यांनी सांगितले.

आयात निर्बंधाचाही परिणाम देशात दरवर्षी साडेसात हजार कोटी रुपयांचे १५० लाख टन खाद्यतेल आयात होते. त्यामुळे आयात कमी करून देशातील शेतकरी आणि उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार आयात कमी करण्यासाठी उपाययोजना करत आहे. यामध्ये रिफाईंड खाद्यतेल आयातीवर निर्बंध, त्यातही रिफाईंड पाम तेलाला आयातशुल्क मुक्त आयात श्रेणीतून वगळण्याचीही समावेश आहे, त्यामुळेही सोयाबीनचे दर वाढले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com