साखर उताऱ्यात एक टक्क्यापर्यंत घट

येत्या दोन महिन्यांमध्ये चांगली थंडी पडली, तरच साखर उताऱ्यात काहीअंशी वाढ होऊ शकते; अन्यथा महत्त्वाचे असणारे जानेवारी आणि फेब्रुवारी महिनेही कारखान्यांना अडचणीचे जातील, अशी शक्यता आहे. - विजय औताडे, साखरतज्ज्ञ
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर : राज्यात यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊन पंधरवडा लोटला आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे पहिल्या टप्प्यात कारखान्यांचा साखर उतारा (रिकव्हरी) सरासरी एक टक्क्यापर्यंत घटला आहे. पहिल्या पंधरवड्यात राज्यातील साखर कारखान्यांचा उतारा ९.६ टक्के राहिला. यामुळे राज्य साखर उत्पादनातही पिछाडीवर गेल्याचे जाणवत आहे. 

कोल्हापूर विभागाची आघाडी राज्याचा गाळप हंगाम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला असला, तरी प्रत्यक्षात गाळप सुरू होण्यास डिसेंबर उजाडला. हंगामाच्या पहिल्या पंधरवड्यात कोल्हापूर विभागाने सरासरी १० टक्के साखर उतारा मिळवत इतर विभागांच्या तुलनेत राज्यात आघाडी घेतली आहे. या विभागात प्रत्येक डिसेंबर महिन्यात साखर उतारा ११ टक्के किंवा त्याहून अधिक असतो; परंतु यंदा तो दहा टक्केच राहिला.

पुणे विभागाचा सरासरी ९, सोलापूरचा ८; तर नगर, औरंगाबाद विभागाचा उतारा सरासरी ७ टक्के इतका राहिला आहे. याचाच परिणाम साखर उत्पादन घटीवर होत आहे. उताऱ्यात एक टक्का घट झाल्याने कारखान्यांना टनामागे मागे दहा किलो साखर कमी मिळत आहे. बाजारभावाप्रमाणे या साखरेची किंमत तीनशे रुपयांहूनअधिक होते; म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत कारखान्यांना टनामागे ३०० रुपयांचा फटका बसत असल्याची माहिती साखर उद्योगातील सूत्रांनी दिली.

जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांवर आशा सध्या राज्यात दुष्काळ व पूरस्थिती यामुळे चांगल्या दर्जाचा ऊस अत्यंत कमी प्रमाणात येत आहे. कोल्हापूर विभागात पूरबाधित ऊस लवकर तोडण्याचा दबाव असल्याने कारखान्यांना हा ऊस प्राधान्याने तोडावा लागत आहे. याचा परिमाण उत्पादन घटीवर झाला. सोलापूर, औरंगाबाद, नगर भागात अपेक्षित पाऊस नसल्याने उसाचे वजन मोठ्या प्रमाणात घटले. साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ११ डिसेंबरअखेर कोल्हापूर विभागात २३ लाख टन उसाचे गाळप झाले. त्याखालोखाल १८ लाख टन पुणे विभागात; तर केवळ ८ लाख टन उसाचे गाळप नगर विभागात झाले. सोलापूर विभागात तर अद्यापही कारखान्यांना सूर गवसलेला नाही. तिथे केवळ ५ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाला आहे.

पहिल्या पंधरवड्यास सगळेच कारखाने क्षमतेइतक्या ऊस गाळपाबरोबरच साखर उताऱ्यासाठी झगडत आहेत. पुढील दोन महिन्यांत थंडी वाढून उताऱ्यात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. डिसेंबरमध्ये मात्र पुरेशी थंडी नसल्याने हा महिना कारखानदारांची कसोटी पाहणाराच ठरत आहे.

बहुतांश भागांत गाळप मंदावले ११ डिसेंबरअखेर राज्यातील ८ विभागांतील ११० कारखाने सुरू झाले आहेत. ६३ लाख टन उसाचे गाळप झाले असून, सरासरी ९.०६ टक्के उताऱ्यानुसार ५७ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. कोल्हापूर, पुणे व काही प्रमाणात नगर वगळता राज्यात ऊस गाळपाची स्थिती खूपच मंदावली असल्याचे चित्र आयुक्तालयाने दिलेल्या गाळप अहवालानुसार आहे.

ऊस हंगामावर परिणाम प्रत्येक वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हंगाम सुरू झाल्यास या दोन महिन्यांत उतारा काहीसा कमी असतो; परंतु डिसेंबर महिना हा जास्त उतारा देणारा असतो; परंतु यंदा डिसेंबरला प्रत्यक्ष हंगाम सुरू झाला. त्यातच निकृष्ट उसाचे प्रमाणही वाढले. या सर्व घटकांचा परिणाम यंदाच्या ऊस हंगामावर झाला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com