मराठवाडा, खानदेशातील नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद  : येथील साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या १८ साखर कारखान्यांनी २३ फेब्रुवारीपर्यंत ३२ लाख २५ हजार ३६७ टन उसाचे गाळप केले. सरासरी ९. ७८ टक्के उताऱ्याने ३१ लाख ५४ हजार ४१६ क्‍विंटल साखर उत्पादन केले. सध्या अठरापैकी जवळपास नऊ कारखान्यांचा गाळप हंगाम संपल्यात जमा आहे. 

औरंगाबाद साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील १८ साखर कारखान्यांनी ऊस उपलब्धता माहीत असतानाही यंदाच्या हंगामात गाळप सुरू केले. काही कारखान्यांचे धुराडे पेटले परंतु काही दिवसांत गाळप थांबविण्याची वेळ कारखान्यांवर आल्याचे चित्र पहायला मिळाले. औरंगाबाद जिल्ह्यातील घृष्णेश्वर कारखान्याने यंदा हंगामात सहभाग नोंदवला पण या कारखान्याकडून आजवर ऊस गाळप झाले नाही. अशीच काहीशी स्थिती १२५० टन दैनिक गाळप क्षमता असलेल्या शरद पैठण कारखान्याची झाली. या कारखान्याचा हंगाम तेरा दिवसांत गुंडाळला गेला.

बीड जिल्ह्यातील जय भवानी साखर कारखान्याची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. ७ डिसेंबर २०१९ ला हंगाम सुरू झालेल्या या कारखान्याचे ३ जानेवारीला अर्थात २६ दिवसांत गाळप थांबले. त्यापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्‍यातील संत एकनाथ (सचिन घायाळ) साखर कारखान्यालाही आपला हंगाम ५१ दिवसांत गुंडाळण्याची वेळ आली. औरंगाबाद जिल्ह्यातील मुक्‍तेश्वर शुगर्सने २९ नोव्हेंबर २०१९ ला हंगाम सुरू करत ६८ दिवसांत अर्थात ७ फेब्रुवारी २०२० ला गाळप बंद केले.

जळगाव जिल्ह्यातील संत मुक्‍ताबाई शुगर अँड एनर्जी कारखान्याने १४ फेब्रुवारी २०२० ला अर्थात ७६ दिवसांनी गाळप बंद केले. नंदूरबारमधील सातपुडा तापी, ॲस्टोरिया(पुष्पदंतेश्वर), औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमधील बारामती ॲग्रो व संभाजी राजे या चारही कारखान्यांचे ऊस गाळप थांबले असल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली. यंदा सुरू झालेल्या कारखान्यांपैकी जवळपास निम्म्या कारखान्यांना अपुरा ऊस, मजुरांची टंचाई आदी कारणांवरून गाळप थांबवावे लागले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

साखर उताऱ्यात घट गतवर्षी औरंगाबाद साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या सहा जिल्ह्यांतील जवळपास २३ कारखान्यांनी ऊस गाळपात सहभाग नोंदविला होता. या कारखान्यांनी सुमारे ८८ लाख टन उसाचे गाळप केले होते. यंदा मात्र स्थिती फारशी चांगली नाही. यंदा केवळ १८ कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग नोंदवला.  १८ कारखान्यांनी २३ फेब्रुवारीपर्यंत ३२ लाख २५ हजार ३६७ टन उसाचे गाळप करत सरासरी ९. ७८ टक्के उताऱ्याने ३१ लाख  ५४ हजार ४१६ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. गतवर्षी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १० टक्‍क्‍यांपुढे होता.   

जिल्हानिहाय कारखाने, ऊस गाळप (टन), साखर उत्पादन (क्‍विंटल) उतारा (टक्के)
जिल्हा  कारखाने  ऊस गाळप साखर उत्पादन साखर उतारा
औरंगाबाद  ५,३२,३९५.०५ ५,१५,४७५  ९.८८
जालना ९,२७,३४३.४५  ९,६१,६४०  १०.३७
बीड  ९,०५,८५७.१२ ७,९१,०७० ८.७३
नंदूरबार   ३  ७,१६,१७९.२४ ७,३२,८८१ १०.२३
जळगाव   १  १,४३,५९२.१२   १,५३,३५०  १०.६८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com