ऊसटंचाईमुळे कारखान्यांचे तोटे वाढतील : साखर संघ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना यंदा उसाची टंचाई भासत असल्यामुळे साखर उत्पादन घटून तोटे आणखी वाढतील, अशी भीती साखर उद्योगातून व्यक्त करण्यात आली आहे. 

गेल्या हंगामात राज्यात १८८ साखर कारखान्यांनी धुराडी पेटवली होती. यात १०१ सहकारी, ८७ खासगी कारखाने होते. त्यांनी ९५२ लाख टन विक्रमी ऊस गाळप केले. गेल्या हंगामात राज्याचा सरासरी साखर उतारा ११.२४ टक्के राहून १०७ लाख टन साखर उत्पादन झाले. ऊसटंचाईमुळे यंदाचे चित्र मात्र डळमळीत झाले आहे. यंदा ५०० ते ५५० लाख टनांपर्यंत ऊस गाळप होईल, असा अंदाज कारखान्यांचा आहे.

११ डिसेंबरपर्यंत ६३ लाख टन ऊस गाळप झाले असून, ५७ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. उतारा सरासरी ९ टक्के मिळतो आहे. राज्य सहकारी साखर कारखाने संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले, की मराठवाडा, नगर, सोलापूर भागांत दुष्काळामुळे, तर पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादन घटले आहे. ऊस म्हणजे कच्चा माल कमी असल्याने अनेक सहकारी साखर कारखान्यांना वित्तीय संकटाशी मुकाबला करावा लागेल. त्यात पुन्हा उसाची प्रतदेखील चांगली नाही. त्यामुळे सरकारने या स्थितीचा आधीच अभ्यास करावा. वेळीच उपाययोजना केल्यास संकटाची व्याप्ती मर्यादित राहू शकेल.

यंदा मजूरटंचाई हीदेखील एक मोठी समस्या आहे. अडीच हजार कोयत्यांचा वापर अत्यावश्यक असलेल्या फडात सध्या १५०० ते १६०० कोयते चालविले जात आहेत. कमी ऊस, घसरलेली गुणवत्ता, मजूरटंचाई यामुळे कारखान्यांचे खर्च वाढून नफा घसरेल. मात्र या समस्येवर सरकारकडेही उपाय नाहीत, असेही संघाचे म्हणणे आहे.    ३९ सहकारी साखर कारखाने बंद  राज्यात गेल्या हंगामात ऊस गाळप करणारे ३९ सहकारी साखर कारखाने बंद आहेत. आत्तापर्यंत ६२ सहकारी आणि ४८ खासगी कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. अटींची पूर्तता न केलेले काही कारखाने गाळप परवान्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र सध्या गाळप करणारे सर्वांत जास्त कारखाने कोल्हापूर भागात आहेत. कोल्हापूरला ३२, पुणे २८, सोलापूर ११, नगर १५४, औरंगाबाद १५, नांदेड ८, तर अमरावती भागात दोन कारखाने सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com