राज्यातील ‘पोल्ट्री’ला तेराशे कोटींचा तोटा; अफवा, लॉकडाऊनने नुकसान

‘कोरोना’मुळे पोल्ट्री उद्योगाला फटका बसला आहे. आम्ही पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन झालेल्या नुकसानीची माहिती त्यांना दिली. त्यांच्याकडे प्रतिकोंबडी १५० रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. — वसंतकुमार सी. शेट्टी, अध्यक्ष, पोल्ट्री फार्मर ॲण्ड ब्रीडर असोसिएशन, सांगली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

 सांगली : कोरोना विषाणूची अफवा आणि लॉकडाउनमुळे राज्यातील पोल्ट्री व्यवसायाला गेल्या दोन महिन्यांत सुमारे तेराशे कोटींचा तोटा झाला आहे. परिणामी हा व्यवसाय मोडकळीस आला आहे. या व्यवसायाच्या पुर्नउभारणीसाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी पोल्ट्री उद्योजकांनी केली आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन केले जाते. या व्यवसायाच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल होते. सध्या जगभरात ‘कोरोना’मुळे अनेक उद्योग बंद करण्यात आले आहेत. त्यातून पोल्ट्री व्यवसायही सुटलेला नाही. मुळात चीनमध्ये ‘कोरोना’ची सुरवात झाली. चिकन खाल्ल्यानंतर कोरोना होतो, अशी अफवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे अंडी, चिकनला मागणी घटली. त्याच दरम्यान या व्यवसायाला ७० ते ७५ टक्के फटका बसला.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर २२ मार्चला लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे वाहतूक बंद आहे. वास्तविक पाहता मुख्यमंत्र्यांनी अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वाहतुकीसाठी परवाने देण्याचे आदेश दिले गेले. परंतु आजही पोलिसांकडून वाहने अडवली जातात. ग्रामीण भागातही बंद आहे. एका बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिकनची दुकाने सुरु करण्यास सांगितले आहे. तर दुसऱ्या बाजूला वाहतूक करण्यास पोलिसांकडून आडकाठी आणली जात आहेत. त्यामुळे माल पोहोच करण्याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्यातील पोल्ट्री उद्योगाचे तेराशे कोटींचे नुकसान झाले असून ते भरून निघणारे नाही. त्यामुळे शासनाने पोल्ट्री उद्योगाला भरीव आर्थिक मदत केली पाहिजे. पक्षी जगवण्यासाठी उपलब्ध असलेले सर्व भांडवल खर्च झाले आहे. आता भांडवल शिल्लक नाही. त्यामुळे व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न उद्योजकांना पडला आहे.

सांगलीत व्यापाऱ्यांनी केली मक्याची साठेबाजी कोंबडीच्या खाद्यासाठी मक्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मका खरेदी केला आहे. परंतु खाद्यासाठी लागणारा मका उपलब्ध होत नाही. सांगलीत व्यापाऱ्यांनी मक्याची साठेबाजी केली असल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांनी सांगितले.

कच्च्या मालाचे दर वाढले कोंबड्यांच्या खाद्य निर्मितीसाठी ८० ते ८५ टक्के मका लागतो. सध्या मक्याची कृत्रिम टंचाई व्यापाऱ्यांनी निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीवर निर्बंध असल्याने वाहतूक दरात तसेच कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना जादा दराने कच्चा माल खरेदी करावी लागत आहे. शासनाने कच्च्या मालाच्या दरावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिकांनी केली आहे.

राज्यातील पोल्ट्रीचा सद्यःस्थितीतील दृष्टिक्षेप

  • अंड्यावरील पक्षी : १ कोटी २५ लाख.
  • एप्रिल महिन्यातील बॉयलर (मांसल) पक्षी : ४ कोटी १५ लाख
  • लेअर पक्ष्यांमधील घट : ५० टक्के 
  • एप्रिल महिन्यातील बॉयलर पक्ष्यांमधील घट ः ७० टक्के 
  • दररोजची अंडी विक्री ः सुमारे दीड कोटी   
  •  प्रतिक्रिया कोरोना विषाणूमुळे चिकन आणि अंड्यांच्या मागणीत घट झाली आहे. पक्षी जोपासण्यासाठी शिल्लक असलेले भांडवल वापरले असून सध्या भांडवल उपलब्ध नाही. त्यामुळे आम्हाला मदत करावी. — शत्रुघ्न जाधव, पोल्ट्री व्यावसायिक, विटा, जि. सांगली   ‘कोरोना’मुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे. परंतु तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यात शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना अंडी दिली जातात. हा प्रकल्प महाराष्ट्रात राबविला तर नक्कीच पोल्ट्री उद्योगाला आधार मिळेल. — डॉ. संजय देशपांडे, व्यंकटेश अ‍ॅग्रो, सांगली.

    या आहेत मागण्या

  • कोंबड्यांच्या खाद्यासाठी लागणारा कच्चा माल स्वस्त दरात उपलब्ध व्हावा.
  • अंडी आणि मांस साठविण्यासाठी शीतगृहांची सोय करावी.
  • शासनाने व्यापाऱ्यांना माल साठवणूकीची क्षमता ठरवून द्यावी.
  • पोल्ट्री व्यवसायाचे सर्वेक्षण करून मदत अथवा अनुदान द्यावे.
  • शालेय पोषण आहारात अंडी द्यावीत.
  • अंड्यांना किमान आधारभूत दर मिळावा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com